अमरावती - कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी यशोमती ठाकूर राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री झाल्याबद्दल अभिनंदन, अशा आशयाचे बॅनर अमरावतीत लावले आहेत. यामुळे यशोमती ठाकूर यांना महिला बाल कल्याण हे खाते मिळाले तर नाही ना? अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहे.
हेही वाचा... 'पक्ष जी जबाबदारी देईल, त्याला योग्य न्याय देणार'
राज्यात सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, सध्या अनेक मंत्र्यांना खातेवाटप झाले नाही. अशातच आज शुक्रवारी यशोमती ठाकूर या मंत्री झाल्यानंतर प्रथम त्यांचे मूळ गाव असलेल्या मोझरी गुरुकुंज येथे आल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरमध्ये त्यांचा उल्लेख 'महिला व बाल कल्याण' खात्याच्या मंत्री असा केला आहे.
हेही वाचा... नूतन मंत्र्यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत; पाहा काय म्हणाले मंत्री मुश्रीफ, सतेज पाटील
ठाकरे सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार होऊन चार दिवस झाले. तरीही अद्याप खातेवाटप झालेले नाही. मात्र, मंत्र्यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्यासाठी कंबर कसत बॅनरबाजीला मात्र सुरुवात केली आहे. अमरावतीत देखील कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांच्या समर्थकांनी त्यांची 'महिला व बाल कल्याण' खात्याच्या मंत्री म्हणून निवड झाल्याचे बॅनर लावल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. एकीकडे तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या खातेवाटपावरून बैठकावर बैठका सुरू आहेत, त्यात अमरावतीत असे बॅनर लागल्याने अनेक चर्चांना उधान आले आहे.