अमरावती - शहरातील वडाळी स्मशानभूमीतील वाढलेली झुडूपे हटवण्यासंदर्भात महापालिकेकडे नागरिकांनी तक्रार केली होती. पालिका प्रशासनाने या संदर्भात दखल न घेतल्याने अखेर नागरिकांनीच पुढाकार घेत स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. नागरिक स्वखर्चाने हे काम करत आहेत.
मागील चार महिन्यांपासून वडाळी स्मशानभूमीत सर्वत्र झुडूपं वाढलेली आहेत. स्मशानभूमीतील गवत आणि झुडूप साफ करण्यासाठी परिसरातील स्वच्छता निरीक्षकास वारंवार सांगूनही काहीही उपयोग होत नसल्याने नागरिकांनी थेट महापालिका आयुक्तांकडे तक्रार दिली. मात्र, यासंदर्भात काहीच कारवाई झाली नाही.
हेही वाचा-अभिनेता अल्लू अर्जुन पर्यटनासाठी टिपेश्वर अभयारण्यात
चार महिन्यांत या स्मशानभूमीत वडाळी, राहुल नगर, बिच्चू टेकडी, राज्य राखीव पोलीस दल वसाहत अशा विविध भागातील जवळपास 55 ते 60 मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यापैकी वडाळी परिसरातील एखाद्या मृत व्यक्तीचे अंत्यविधी सुरू तिथे आलेल्या अनेक नागरिकांनी तिथली झुडूपं काढण्याचा प्रयत्न केला होता.
महापालिका प्रशासन दाखल घेत नसल्याने वडाळी परिसरातील रहिवासी असणारे शहराचे माजी महापौर अशोक डोंगरे यांच्या पुढाकाराने आता मजूर लावून स्मशानाला झुडुपांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमात वडाळी परिसरातील सतीश प्रेमालवार, सोमेश्वर मुंजाळे, रंगराब शेंडे आदी नागरिक सहभागी झाले आहेत.