अमरावती - निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली की विविध कारणांनी निवडणूक आयोग सतत चर्चेत राहते. त्यामध्ये मतदार यादीतील घोळ, मतदारांची नावे गहाळ होणे, तर कधी झालेल्या मतदानाची बेरीज जुळवण्याच्या कारणावरून निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले जातात. आता तर चक्क निवडणूक आयोगाने अमरावतीच्या तिवसा मतदारसंघातील मोझरी गावातील मतदारांना वाटलेल्या मतदान स्लिपवरील वेळच सहा तासांनी वाढवून सायंकाळी सहा ऐवजी बारा केल्याने मतदान वेळेचे निवडणूक आयोगानेच बारा वाजवल्याचे समोर आले आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर निवडणूक आयोगाकडून प्रचार प्रसार केला जात आहे. त्यातच निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली मतदानाची वेळ ही सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत आहे. त्याच वेळेनुसार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत असतात. मात्र, अमरावतीच्या तिवसा मतदारसंघातील मोझरी या गावातील हजारो मतदारांना मतदानाच्या ज्या स्लिप निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. यातील हजारो स्लिपमध्ये मतदानाची वेळ ही सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत नमूद असल्याचे उघड झाले आहे.
हेही वाचा - ...तर ईडीची पहिली चौकशी आदित्य ठाकरेंची होणार- अमोल मिटकरी
निवडणूक आयोगाच्या या भोंगळ कारभारामुळे मतदारांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. मतदानाची वेळ ही रात्री बारा वाजेपर्यत असल्याने मग आम्ही रात्री नऊ वाजताही मतदान केले तर चालणार का? असा सवाल मतदार विचारत आहे. मतदान यादीत निवडणूक आयोगाकडून चूक झाली किंवा मतदाराकडून थोडीही चूक झाली तर मतदाराला मतदानापासून वंचित राहावे लागते. मात्र, आता मतदानाच्या वेळचे निवडणूक अयोगानेचे बारा वाजवल्याने ही मोठी चूक करणाऱ्या निवडणूक विभागातील संबधीतांवर कारवाई करून त्या संबधीतांचे निवडणूक आयोग बारा वाजवणार का असा प्रश्न मतदार विचारीत आहेत.
हेही वाचा - आदित्य ठाकरेंकडे एवढी संपत्ती आली कुठून? - अमोल मिटकरी
दरम्यान या गंभीर प्रकरणा विषयी ईटीव्ही भारतशी बोलताना तिवसा मतदार संघाचे निवडणूक निर्णायक अधिकारी रमेश फुलझले म्हणाले की ही सॉफ्टवेअर, प्रिंट मिष्टीक झाली असावी. मी अनेक ठिकाणी बोललो तेथील मतदानाच्या स्लिप वरील वेळ ही सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यत आहे. पण हा घोळ एकाच गावात झाला आहे.