अमरावती - जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असणाऱ्या 18 परदेशी नागरिकांना गुरुवारी न्यायालयाने जामिनावर मुक्त केले. या सर्व 18 जणांना कारागृहातून डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंधविद्यालयात क्वारंटाईन केल्यावर त्यांना गुरुवारी रात्री शहरातील एका हॉटेलमध्ये हलवण्यात आले.
शहरातील साबनपुरा भागत मशिदीमध्ये एकूण 18 परदेशी नागरिक जानेवारी महिन्यापासून राहत होते. एप्रिल महिन्यात या परदेशी नागरिकांना खोलपुरी गेट पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये म्यानमारवरून आलेले 10 व्यक्ती ज्यात 5 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश होता. तसेच अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रत्येकी एक आणि टोगिलाईन्स देशातील 6 जणांचा समावेश होता. केवळ पर्यटनासाठी वापर होणारा प्रवासी व्हिसा या 18 जणांकडे होता.
पोलिसांनी या 18 जणांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी कारागृहात केली होती. या 18 जणांच्या सुटकेसाठी बरेच प्रयत्न होत असताना न्यायालयाने त्यांना जामिनावर मुक्त केले. कारागृहातून मुक्त होणाऱ्यांना जेल क्वार्टर परिसरात असणाऱ्या डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात क्वारंटाईन केले जात असल्यांस या 18 जणांची रवानगी दुपारी या अंध विद्यालयात करण्यात आली. 18 परदेशी नागरिक जामिनावर मुक्त झाल्याची माहिती मिळताच डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयासमोर मोठी गर्दी उसळली.
अंध विद्यालयात असणाऱ्या 18 परदेशी नागरिकांना इतरत्र हलवण्याची परवानगी मिळल्याबर गुरुवारी रात्री सर्व 18 जणांना शहरातील एका हॉटेलमध्ये हलवण्यात आले. डॉ. नरेंद्र भिवापुरकर अंध विद्यालयासमोर गर्दी उसळली असताना याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त नव्हता. 18 परदेशी नागरिकांना अंध विद्यालयातून हलविण्यात आल्यावर फ्रेजारपूरा पोलिसांचा ताफा अंध विद्यालयासमोर पोहचला.