अमरावती - जिल्ह्याला रोज 3 हजार रेमडेसिवीरचा पुरवठा करावा अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केले आहे. या दोघांनीही दिल्ली येथे केंदीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांना प्रत्यक्ष भेटून यासंदर्भातली मागणी केली.
जिल्ह्याच्या परिस्थितीची दिली महिती
कोरोनामुळे रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. खासगी, सरकारी दोन्ही प्रकारचे हॉस्पिटल फुल्ल आहेत. रुग्णांना बेड नाहीत, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही अशा स्थितीत या कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत असून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतकांच्या नातेवाईकांना खूप प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातील या भयावह परिस्थितीची माहिती खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना दिली.
रेमडेसिवीर पुरवण्याची मागणी
कोरोना रुग्णांना दिलासा देणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा संपूर्ण जिल्ह्यात आहे. खासगी रुग्णालयात असणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन मिळवताना खूप त्रास होतो, कधीकधी रुग्ण दगावतोसुद्धा. म्हणून खासगी वितरकांनासुद्धा आवश्यक त्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे. सद्यस्थितीत सन फार्मा, हेट्रो लॅबोरेटरी,सिपला लॅबोरेटरी, झायडस कॅडीला, मायलॉन लॅबोरेटरी आणी जुबीलटं या कंपन्यांचे प्रत्येकी 1200 रेमडेसिवीर आवश्यक असताना अनुक्रमे 440, 2605, 760, 96 अशा संख्येने 3904 इंजेक्शन उपलब्ध आहेत व 4704 इंजेक्शनचा तुटवडा आहे. ही सर्व आकडेवारी मंत्रीमहोदयांसमोर ठेवून प्रतिदिन नियमितपणे 3 हजार रेमडेसिवीर वायल अमरावती जिल्ह्याकरिता वितरित करण्यात यावे अशी मागणी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी डॉ हर्षवर्धन यांना केली आहे.