अमरावती - लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची चाकेही थांबली आहेत. त्यामुळे परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाला दररोज 35 लाख रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. अत्यावश्यक सेवेच्या माध्यमातून एसटी महामंडळला केवळ 15 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. परिणामी आधीच एसटी महामंडळची परिस्थिती बिकट असताना आता या लॉकडाऊनमुळे पहिल्यापेक्षा ही परिस्थिती बिकट झाल्याचे दिसून येते.
विभागात दररोज साधारण 35 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. तेव्हा सर्व बसेस रस्त्यावर धावत होत्या. परंतु 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा जबर फटका पुन्हा एकदा राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. दिवसाला चार ते पाच फेऱ्या होत आहेत. विभागातील अत्यावश्यक सेवेसाठी धावत असलेल्या एसटी बस साधारण: एक ते तीन हजार किलोमीटर धावत आहे. त्यामुळे 15 ते 30 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. मात्र संचारबंदीमुळे दररोज 35 लाख रुपयांचे नुकसान एसटी महामंडळाला होत असल्याचं एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.