अमरावती - मुस्लिम बांधवांचा पवित्र रमझान महिना सुरू होणार आहे. त्यामुळे 3 एप्रिलपासून जमावबंदीचे आदेश शासन निर्णयानुसार अमरावती पोलिसांनी काढले आहेत. एप्रिल महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह राम नवमी, हनुमान जयंती हे उत्सव येणार आहेत. हिंदूंच्या सणांवर वरवंटा फिरवणारे आदेश भाजप सहन करणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी दिला आहे.
तीन वर्षे सर्वच बंद - कोरोनामुळे गेली तीन वर्षे महाराष्ट्रात कोणतेही उत्सव साजरे झाले नाहीत. तीन वर्षे सगळं काही बंद असताना आता राज्यात मोगलाई लागली असल्याचे चित्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निर्माण केले असल्याचा आरोपही शिवराय कुलकर्णी यांनी केला. पवित्र रमझान महिना मुस्लिम बांधवांनी साजरा करावाच, मात्र रमझान आल्यामुळे हिंदूचे सण साजरे करण्यावर बंदी घालणे हे खपून घेतले जाणार नाही, असेही शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले.
मतपेटीसाठी विशिष्ट समुदायाचा अनुनय - 12 आणि 13 नोव्हेंबरला अमरावतीत जी परिस्थिती निर्माण झाली होती ती पोलीस उपायुक्त मकामदार यांनी पोलीस बंदोबस्त न लावल्यामुळे निर्माण झाली होती. त्या परिस्थितीचे कारण दाखवत हिंदूंच्या सणांवर बंदी घालण्याचा निर्णय योग्य नाही. केवळ मतपेटीसाठी विशिष्ट समुदायाचा अनुनय करणे योग्य नसल्याची टीका देखील शिवराय कुळकर्णी यांनी राज्य सरकारवर केली आहे.