अमरावती - बडनेरा लगतच्या मधुबन वृद्धाश्रम येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात झालेल्या वादाबाबत शिवसेना जिल्हाध्यक्ष दिनेश बुब यांनीआपली प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रवी राणा आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीबाबत बोलताना बुब यांनी, आपण कोणत्याही महिलेचा अपमान केल्याचे विधान केले नाही, मात्र रवी राणा हे प्रसिद्धीसाठी खोटे बोलत असल्याचे, म्हटले आहे.
हेही वाचा.... आमदार रवी राणा समर्थक अन् शिवसैनिकांमध्ये जोरदार हाणामारी
गेल्या 35 वर्षांपासून मी सेवाभावी वृत्तीने समाजकार्य करत आलो आहे. हेल्पलाइनच्या माध्यमातून अनेक पीडित महिला युवतींना मी न्याय मिळवून दिला आहे. असे असताना आपल्याकडून महिलेबाबत अपशब्द काढला असा खोटा कांगावा करत रवी राणा केवळ प्रसिद्धीसाठी आपली बदनामी करत आहेत. उलट कोणतेही कारण नसताना त्यांनीच आम्हाला हाणामारी केल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख दिनेश बुब यांनी म्हटले आहे.
हेही वाचा.... आमदार यशोमती ठाकुरांचा धनगर समाजाने कोकरू देऊन केला सन्मान
दिवाळी निमित्त बडनेरा लगतच्या मधुबन वृद्धाश्रम येथे आयोजित कार्यक्रमात बडनेराचे आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश बूब एकत्र आले होते. यावेळी दिनेश बूब यांनी खासदार नवनीत राणा यांच्याबाबत अपशब्द उच्चारल्यामुळे, आपण त्यांना मारल्याचे आमदार रवी राणा यांनी म्हटले होते. मात्र दिनेश बूब यांनी राणा यांच्या वक्तव्याचे खंडन केले आहे. ईटीव्ही भारतला दिलेल्या प्रतिक्रीयेत बोलताना दिनेश बुब म्हणाले की, रवी राणा प्रसिद्धीसाठी काहीही करू शकतात. मधुबन वृद्धाश्रमात कार्यक्रम सुरू असताना अचानक त्यांनी मला मारहाण केली. नंतर आपल्याकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. या प्रकारानंतर आमदार रवी राणा हेच, मी महिलेचा अनादर केल्याचे सांगत आहे. वास्तवात आपण कोणत्याही महिलांचा अपमान केलेला नाही, असे दिनेश बुक यांनी म्हटले आहे.