अमरावती - नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील लाचखोरीचा विषय चव्हाट्यावर आला आहे. अमरावती येथील वाळू व्यावसायिकाने आरटीओ अधिकाऱ्यांच्या पैशाच्या मागणीला कंटाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रधान सचिवांकडे मागणी केली आहे.
अमरावती येथील वाळू व्यावसायिक भंडारा ते अमरावती या मार्गावर वाळू वाहतूक करतात. या वाहतुकीदरम्यान नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काही अधिकारी त्यांच्या दलालामार्फत त्रास देत असल्याचा दावा वाळू व्यावसायिक आदिल अहमद यांनी केला आहे.
वाळू व्यावसायिक आदिल अहमद यांनी सांगितले, की गेली चार वर्षे वाळुची वाहतूक सरकारच्या नियमानुसार करत आहे. त्यासाठी लागणारे सर्व शुल्क नियमित भरत आहे. तरीही नागपूर प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी पैशांची मागणी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व प्रकरणाची तक्रार परिवहन आयुक्त तसेच दक्षता समितीकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
लाच प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अभय?
नागपूर शहरातील नितीन नायक या दलालाने अमरावतीच्या वाळू व्यावसायिकाकडे दोन महिने वाळू वाहतुकीसाठी ८ हजार रुपयांची मागणी केली. यानंतर संबंधित ट्रक मालकाने अमरावती येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली. तक्रार दाखल झाल्यावर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून दलाल नितीन नायक याला ताब्यात घेतले. यावेळी नायक याने नागपूर प्रादेशिक परिवहन विभागातील काही बड्या अधिकाऱ्यांची नावे सांगितली. त्या अधिकाऱ्यांसाठी आपण ट्रक चालकांकडून पैसे वसूल करत असल्याची त्याने कबुली दिली. मात्र या सर्व प्रकरणात नावे आलेल्या आरटीओमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अद्याप अमरावती लाचलुचपत विभागाने कुठलीही कारवाई केली नाही.