अमरावती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदावर आल्यापासून महाराष्ट्राला साडेसाती लागली ( Ravi Rana Criticized CM Thackeray ) आहे. महाराष्ट्राची ही साडेसाती दूर व्हावी, यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalis Recitation ) करावे, असे आवाहन बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केले आहे.
भगव्या सेनेने माझ्या घरा समोर घातला धिंगाणा - शुक्रवारी रात्री शिवसैनिकांच्या वतीने आमदार रवी राणा यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करून आमदार रवी राणांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. याबाबत बोलताना आमदार रवी राणा यांनी शिवसैनिकांना भगोड्या सेनेचे कार्यकर्ते असे संबोधित केले. भगोड्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरासमोर येऊन धिंगाणा घातला. त्यांना माझ्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करायचे होते, तर अशी नारेबाजी आणि धिंगाणा घालण्याचा प्रकार केला आहे. हे सर्व भगोडे सैनिक चोरासारखे माझ्या घरासमोर आले आणि दारू पिऊन त्यांनी गोंधळ घातला, असा आरोप देखील आमदार रवी राणा यांनी केला.
मी छातीठोकपणे मातोश्रीवर जाणार - मी अशा भगोड्या सेनेच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वागणारा नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण करावे. यासाठी मी स्वतः छातीठोकपणे मातोश्रीवर जाणार आहे. हनुमान चालीसा पठणासाठी उद्धव ठाकरे यांना काँग्रेसच्या अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते का, असा सवाल देखील रवी राणांनी उपस्थित केला आहे.
अमरावतीकरांना हनुमान चालीसा पठनाचे केले आवाहन - हनुमान जयंतीच्या पर्वावर शहरातील प्रत्येक हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठणासाठी रवी राणांनी भोंगे वाटप केले. शहरातील सुमारे शंभर मंदिरांमध्ये हे भोंगे वितरित करण्यात आले आहे. हनुमान जयंतीच्या पर्वावर अमरावती शहरातील सर्व हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठण व्हावे, असे आवाहन आमदार रवी राणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करणार - हनुमान जयंतीनिमित्त शहरातील साई नगर परिसरात अकोली मार्गावरील हनुमान मंदिरात खासदार नवनीत राणा यांच्यासह आमदार रावी राणा हनुमान चालीसा पठण करणार आहेत.