अमरावती - राज्यात लॉकडाऊनमध्ये थोड्या प्रमाणात शिथिलता मिळाली असली तरी राज्यातील पर्यटनस्थळे सुरू करण्यासाठी सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यातही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे चिखलदरामध्ये पर्यटनास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
हेही वाचा... खाट का कुरकुरतेय?, मंत्री चव्हाण अन थोरातांवर सामनातून 'तिरकस बाण'
राज्यातील महत्वाच्या पर्यटन स्थळांपैकी चिखलदरा हे पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर येथे पर्यटक येत असतात. जून महिन्यात पावसाळा सुरू झाला की, हजारो पर्यटकांचा ओढा या ठिकाणी असतो. मात्र, लॉकडॉऊनमुळे पर्यटन बंद असल्यामुळे पर्यटकांविना चिखलदऱ्यातून शुकशुकाट पहायला मिळत आहे. त्यामुळे पर्यटकांवर अवलंबून असलेला हॉटेल, लॉज, जिप्सी, फळे विक्री, चहा-कॉफी दुकाने, खवा विक्री आदी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अमरावतीपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेले चिखलदारा हे स्थळ निसर्गाच्या अद्भूत किमयाने पर्यटकांना भुरळ घालत असते. पावसात शेकडो फूट उंचीवरून कोसळणारे धबधबे, डोंगरवाटा, नागमोडी रस्ते, पावसाळ्यात दिवसभर रिमझिम पडणार पाऊस, अंगावर काटा आणणारी गुलाबी थंडी अशा विविध कारणांनी चिखलदरा पर्यटन स्थळ हे पर्यटकांच्या आवडीचे आहे. परंतु, मागील अडीच महिन्यांपासून पर्यटन स्थळ बंद असल्याने चिखलदरा, सीमांडोह, कोलकास येथील व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळेच येथे पर्यटन सुरू करावे, अशी मागणी व्यवसायिक करत आहेत.