अमरावती - अमरावती शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर मोर्शी तालुक्यात सुंदर गडावर पिंगळादेवीचे मंदिर आहे. पिंगळादेवी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या कमळजादेवी या दोन्ही देवींची उत्पत्ती गडावर असणाऱ्या विहिरीतून झाली. माहूरच्या रेणुका देवीचे प्रति रूप असणाऱ्या पिंगळा देवीच्या दर्शनासाठी विदर्भातून अनेक भाविक मंदिरात येतात. नवरात्रात सुंदर गडावर मोठा उत्सव असतो. नवरात्र उत्सवा दरम्यान हजारो भाविक पिंगळादेवीच्या दर्शनासाठी सुंदर गडावर येतात.
जागृत देवस्थान म्हणून मान्यता - श्री पिंगाळादेवी मंदिर हे जागृत देवस्थान असून अनेक भाविकांची ही कुलदेवता आहे. या मंदिराचा इतिहास फार पुरातन असून श्री पिंगळा मातेचे मंदिर सुमारे 600 ते 700 वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. सुंदर गडावर असणाऱ्या पिंगळादेवीच्या मंदिरामुळे आता या मंदिराला पिंगळा पिंगळा देवी गड असेही संबोधले जाते. पिंगळा देवीची उत्पत्ती विहिरीतून झाली आहे. जुन्या मान्यतेनुसार पिंगळादेवी आणि समाजादेवी या स्वयंभू आहेत. गाभाऱ्यामध्ये भव्य पाषाणाची शेंदूर माखलेली पिंगळादेवीची मूर्ती ही अंदाजे चार फूट उंच आहे. या देवीच्या बाजूला कमळजा देवीची देखील मूर्ती आहे.
निजाम आणि भोसले यांच्या छत्रछायेत होते मंदिर - पिंगळादेवी मंदिराच्या विकासासाठी निजाम आणि भोसले या शासकांकडून मदत मिळायची. हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर जीर्ण झाल्यामुळे आता ते गाभारा वगळता संपूर्ण तोडण्यात आले आहे. या मंदिराचे नव्याने बांधकाम सुरू सुरू आहे. गत अनेक वर्षांपासून मारुडकर कुटुंबाकडे या मंदिराच्या देखरेखीची जबाबदारी आहे. सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून यासाठी दहा कोटी रुपये खर्च येणार असून भाविकांनी मदत करण्याचे आवाहन श्री पिंगा देवी संस्थानचे सचिव आशिष मारुडकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना केले.
कापूर तलावात रोज पहाटे देवी येत असल्याची आख्यायिका - सुंदरगड अर्थात पिंगळा देवी गडावर मंदिरापासून काही अंतरावर एक तलाव आहे. एवढ्या उंचावर असणाऱ्या या तलावात बाराही महिने पाणी असते. पिंगळादेवी रोज पहाटे या तलावात आंघोळीसाठी येथे अशी आख्यायिका आहे. या तलाव परिसरात भाविक नवरात्रोत्सवा दरम्यान कापूर पेटवून आरती करतात.