अमरावती- भाजपने सत्तेत असताना राज्यात कोट्यवधी वृक्ष लागवडीचे अभियान सुरू केले होते. मात्र, भाजपची सत्ता असलेल्या अमरावती महानगरपालिकेने अमरावती जुन्या बायपासच्या रुंदीकरणासाठी बांधकाम विभागाला ११५ जुनी आणि मोठी झाडे तोडायला परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी वृक्षप्रेमींनी आक्षेप नोंदवला आहे.
शहरालगत असलेल्या अमरावती ते बडनेरा या जून्या बायपासच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यालगत असलेल्या मोठ्या झाडांची कत्तल सुरू आहे. याच मार्गावर जिल्हाधिकारी निवास, विभागीय आयुक्त कार्यलय, तसेच विभागीय आयुक्त यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निवासस्थान या मार्गावर आहे. याच परिसरात आज सकाळपासून वृक्ष तोड सुरू झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
झाडांचे प्रमाण आधीच कमी होत असल्याने प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. रस्त्याच्या बाजूला दिवसभर सावली देणारी ब्रिटीशकालीन ११५ झाडे विकासाच्या नावाखाली तोडली जात असल्याने या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या संबंधी शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.