अमरावती - देशभरात स्थालंतरित मजुरांचे हाल होत असताना जिल्ह्यात दिलासादायक चित्र दिसून येत आहे. परप्रांतीय मजुरांसाठी अमरावती शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वऱ्हाड विकास संस्थेच्यावतीने 24 तास जेवणाची व्यवस्था केली आहे.
वऱ्हाड विकास संस्थेकडून मजुरांना सलग 52 दिवसांपासून 24 तास जेवण दिले जात आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी टाळेबंदी जाहीर होताच वऱ्हाड संस्थेचे प्रमुख रवी वैद्य यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने भीमटेकडीलगत राष्ट्रीय महामार्गावर जेवणाची व्यवस्था केली आहे. येथे आजवर एक लाखांपेक्षा अधिक मजुरांनी जेवण केले आहे.
हेही वाचा-'केंद्राच्या पॅकेजने शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही, हमीभावासह कर्जमुक्ती अपेक्षित'
गेल्या 15 दिवसांपासून राज्यभरात विविध शहरात अडकलेले परप्रांतीय मजूर, ट्रक, खासगी बस, ऑटो रिक्षा, दुचाकी, सायकल तर कुणी चक्क पायी मूळ गावी निघाले आहेत. हे सर्व परप्रांतीय मजूर अमरावती शहरातून महामार्गावरून जाताच त्यांना थांबवून संस्थेचे कार्यकर्ते जेवण देत आहेत. महामार्गावर या मजुरांना हात धुण्यासाठी आणि पिण्यासाठी पाण्याची खास व्यवस्था आहे. दुचाकी किंवा सायकलने जाणाऱ्या मजुरांना काही वेळ आराम करता यावा, यासाठी महामार्गलगत झाडाच्या सावलीत सतरंजी आणि गाद्याही टाकण्यात आल्या आहेत. भर उन्हात तसेच रात्रीच्या अंधारात निघालेल्या प्रवाशांना वऱ्हाड विकास संस्थेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा-कोरोना लॉकडाऊनसह वाढत्या तापमानाचा शेतकऱ्यांना फटका; पपईच्या बागा उद्ध्वस्त
कोरोनाच्या संकटात स्थलांतरित मजुरांना दिलासा दिला जात असल्याने संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.