अमरावती - एमपीएससीची परीक्षा रद्द झाल्याविरोधात अमरावतीत रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या प्रकारामुळे पंचवटी चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.
पंचवटी चौकात जमले विद्यार्थी
अनेक वर्षापासून या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा सलग चौथ्यांदा रद्द झाल्याने शेकडो विद्यार्थी पंचवटी चौकात एकत्र आले. विद्यार्थ्यांनी शासनाचा निषेध नोंदवत चौकात ठिय्या दिला.
पोलिसांनी दिला विद्यार्थ्यांना चोप
पंचवटी चौक येथे ठिय्या देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत माहिती मिळताच गाडगे नगर पोलीस घटनास्थळी पोहचले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी राज्य राखीव पोलीस दलाची तुकडीही बोलावली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली असता, पोलिसांनी विद्यार्थ्यांना चोप दिला. पोलिसांनी लाठीचार्ज करताच विद्यार्थी मिळेल त्या दिशेने सैरावैरा पळाले.
हेही वाचा - एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा : नाना पटोले
40 विद्यार्थ्यांना घेतले ताब्यात
गाडगे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले यांनी विद्यार्थ्यांना पकडण्याचे आदेश दिल्यावर एकूण 40 विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. युवकांसह युवतींनाही यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले.
डॉ. अनिल बोंडे यांना केली अटक
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करणे आणि एकाच गाडीत युवक आणि युवतींना कोंबून नेण्याच्या विरोधात माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पोलीस निरीक्षक चोरमोले यांना जाब विचारला असता चिरमोले आणि डॉ. बोंडे यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी पोलीस निरीक्षक चोरमोले यांनी डॉ. अनिल बोंडे यांना अटक केली.
हेही वाचा - 14 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थीं संतप्त, विद्यार्थ्यांचा रास्ता रोको