अमरावती - विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीयेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. अकोला पालकमंत्री शेतकऱ्यांसाठी आसूड यात्रा काढतात. दिल्लीपर्यंत जातात. आज सत्तेत बच्चू कडू (bacchu kadu) राज्यमंत्री आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याकडे मांडायला पाहिजे होते. मात्र बच्चू कडू बोलत नाहीत. ते फक्त स्टंट करतात. खरोखर शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू काम करत असतील तर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्रीबाहेर पाडून विदर्भात आणावे, आमदार रवी राणाकडून स्वागत करण्यात येईल, अन्यथा बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान अपक्ष आमदार रवी राणा (ravi rana) यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना केले आहे.
हेही वाचा - बच्चू कडूंच्या स्टिंग ऑपरेशननंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री शिंगणेंकडून अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत
'त्या आश्वासनांचे काय झाले?'
काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्या टीकेला शिवसैनिकांनी आंदोलन करून उत्तर दिल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनीदेखील आमदार रवी राणा यांचा समाचार घेतला होता. रवी राणा यांनी देखील सामूहिक विवाह सोहळा घेतला होता, त्यावेळेस त्या जोडप्यांना देखील अनेक आश्वासने दिली, त्या आश्वासनांचे काय झाले? मग आम्ही तुम्हाला बेशरम म्हणावे का, असा प्रश्नदेखील बच्चू कडू यांनी उपस्थित केला होता. त्याच बच्चू कडू यांच्या प्रश्नावर आता आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे.
हेही वाचा - आमदार रवी राणांकडून अर्धवट काम झालेल्या भुयारी मार्गाचे लोकार्पण, कोरोना नियमांची पायमल्ली
स्टिंग ऑपरेशनवरही टीका
राज्याचे शिक्षण राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी अकोला व पातूर शहरात एका मुस्लीम व्यक्तीच्या वेशात जाऊन गुटखा विक्री दुकानांवर धाड टाकली होती. बच्चू कडू यांच्या या स्टिंग ऑपरेशनवरदेखील आमदार रवी राणा यांनी टीका केली असून बच्चू कडू यांना नौटंकीची सवयच असल्याचे राणा म्हणाले आहेत.