अमरावती - राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका मात्र कायम आहे. परंतु असे असताना भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांचा फज्जा उडाला असून तिसऱ्या लाटेला ही यात्रा आमंत्रण देणार असल्याची टीका राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे. सध्या भाजपाच्या चार नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांकडून राज्यभरात जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे. आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत मुंबईतही या यात्रेला सुरुवात झाली आहे.
राज्यात साधारण दीड वर्षापासून महाविकास आघाडी सरकार राज्यात चांगल्या प्रकारे काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे सर्व सोबत मिळून हे सरकार चालवत आहे. सरकार आल्यानंतर कोरोना आला अनेक निर्बंध आले. राज्याच्या उत्पादनावर परिणाम झाला. जीएसटीचे पैसे केंद्र सरकारकडून मिळत नाही. मागील काळामध्ये नैसर्गिक वादळ, महापूर संकट आपल्या राज्यावर आले आहे. अशा परिस्थितीतही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाच्या कामाला खंड पडू दिला नाही. आर्थिक उत्पन्न कमी असले तरी महाविकास आघाडी सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. तसेच पुढचे पाच वर्ष
हे सरकार टिकेल, असेही मंत्री शिंगणे म्हणाले.
'भाजपाच्या एकही मुख्यमंत्र्यांचे नाव नाही'
टाईम्सच्या यादीमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे. परंतु भाजपाच्या एकाही मुख्यमंत्र्यांचा समावेश नाही, असा टोलाही राजेंद्र शिंगणे यांनी लगावला आहे. शरद पवार हे पहिल्यापासून समानतेचे राजकारण करत आहे. राजकारण करत असतांना त्यांनी कधी जाती-धर्माचा विचार केला नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी ते प्रेरित झाले आहे. त्यामुळेच ते राज्यासाठी जातीपातीला विचार केला नाही, असेही शिंगणे म्हणाले. दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज घेता राज्य सरकारकडून औषध रेमडेसिवीर साठ्याची तयारी करण्यात आल्याची माहितीही मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
हेही वाचा - बैलगाडी शर्यत तर होणारच, आमदार गोपीचंद पडळकर यांचा एल्गार