अमरावती - सध्या कोरोना काळात गरज असताना देखील रक्तातील नातेवाईक, हक्काचे लोक या काळात परके होताना दिसत आहे. मात्र, परक्या लोकांना आपले मानून त्याने लढण्याचे बळ देण्यासाठी व कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी मदत केली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चतून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर व चांदुर बाजार येथे प्रत्येकी शंभर खाटांचे असे एकूण दोन भव्य कोविड केअर सेंटर काही दिवसांपूर्वीच सुरू केले आहे.
गोड जेवणामुळे कोरोनाबधितांच्या चेहऱ्यावर हास्य
या कोविड सेंटरमध्ये नेहमी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा फेरफटका असतो. आज तर चक्क चांदूर बाजारमधील तिरुपती मंगलम या कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना बच्चू कडू यांच्याकडून पूरण पोळी, आंब्याचा रसाचा गोड असा खमखमीत पाहुणचार करण्यात आला. सोबत भजे, पापड, तूप, चपाती, भाजी वरणभात आदी दर्जेदार पदार्थांची व्यवस्था रुग्णांसाठी केली होती. राज्यमंत्री बच्चू यांच्याकडून दिलेल्या या गोड जेवणामुळे कोरोनाबधितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार
राज्यात काही दिवसांपूर्वी कोरोनाची दुसरी लाट होती. या लाटेमध्ये रुग्णांना रुग्णालयात बेडसुद्धा मिळत नव्हते. त्यामुळे लोकांना बेड मिळावे व सरकारलाही हातभार लागावा यासाठी बच्चू कडू यांनी स्वखर्चातून हे सुसज्ज असे दर्जेदार कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. यामध्ये अनेक कोरोनाबाधित उपचार घेत आहे. रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून त्यांना पौष्टिक आहार देण्यात येतोय.
हेही वाचा - ईटीव्ही ग्राउंड रिपोर्ट : सायळीसह साताऱ्यातील २७ गावात आतापर्यंत एकही नाही कोरोना बाधित