अमरावती - शहरातील जवळपास सर्वच व्यवसाय सुरू झाले असून, आमची सलुनची दुकानं उघडण्याची परवानगी द्या किंवा आम्हाला 10 हजार रुपये मदत द्या, अशी मागणी करत मंगळवरी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊननंतर हा पहिलाच मोर्चा असून, यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.
कोरोनाचे संकट आल्यामुळे 23 मार्चपासून अमरावती शहरातील सर्व सलून व्यवसाय बंद आहे. यामुळे नाभिक समाज आर्थिक अडचणीत सापडला आहे. आता अनेक व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली जात आहे. मात्र, सलून सुरू करण्याबाबत कुठलाही विचार केला जात नसल्यामुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या अमरावती शाखेचे अध्यक्ष सुभाष मानेकर यांच्या नेतृत्वात अनेक सलून चालक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला.
आज शहरातील सर्व व्यवसाय सुरू आले आहेत. आमचे सलून सुरू करण्याचा निर्णय मात्र होत नाही. अशा परिस्थितीत सलून चालकांना 10 हजार रुपये मदत मिळावी, अशी मागणी आम्ही शासनाकडे करत आहोत, असे सुभाष मानेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
या आंदोलनात अरुण निभोरकर, विवेक राऊत, निलेश जावरकर, नजीम शेख, प्रवीण कनेरकर, अतुल शिरवळकर, सचिन नागपूरकर, अनंत कडू, शरद वानखडे, रवी धानोरकर, अमोल इंगळे, मंगेश खेडकर, संजय आजनकार, सुनील नांदूरकर आदी सहभागी होते.