अमरावती - जिल्ह्यात संपूर्ण विभागात जून ते ऑक्टोबर दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळल्यामुळे भूजल पातळी वाढली आहे. भूजल पातळी (Groundwater level) वाढल्यामुळे रब्बी पिकांना फायदा होणार आहे. शिवाय जिल्ह्यातील मेळघाट तसेच विभागातील पाचही जिल्ह्यात अनेक गावात पाणीटंचाई आहे. मात्र पातळी वाढल्यामुळे पाणीटंचाई भासणार नाहीत. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे विभागातील निरीक्षण विहिरींच्या नोंदीनुसार हे सुख चित्र स्पष्ट झाले आहे.
553 निरीक्षण विहिरींच्या पाहणीचा निष्कर्ष
जून ते ऑक्टोबर दरम्यान सरासरी अपेक्षित असणाऱ्या पावसापेक्षा अधिक पाऊस कोसळला. विभागात साधारणपणे ऑगस्ट महिन्यापासून भूजलाचे पुनर्भरण सुरू होते. याच कालावधीत संततधार तर कधी मुसळधार पाऊस कोसळला. यावर्षी ऑक्टोबर महिन्यातही मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत 1. 91 मीटरपर्यंत वाढ नोंदविण्यात आली आहे. विभागातील 553 विहिरीच्या नोंदीद्वारे विभागातील भूजल साठ्याची माहिती समोर आली असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे भूवैज्ञानिक उल्हास बंड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
56 तालुक्यात अशी वाढली भूजल पातळी
अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील एकूण 56 तालुक्यांमध्ये 0 ते 1 मीटरपासून 3 मीटरपेक्षा अधिकपर्यंत भूजल पातळी वाढली आहे. यामध्ये शून्य ते 1 मीटरपर्यंत 22 तालुक्यात भूजल पातळी वाढली आहे. अमरावती जिल्ह्यातील 14 तालुके, अकोला जिल्ह्यातील 7 तालुके, वाशिम जिल्ह्यातील 6 तालुके, बुलडाणा जिल्ह्यातील 13 तालुके आणि यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांचा समावेश आहे. यापैकी 1 ते 5 मीटरपर्यंत 25 तालुक्यात भूजल पातळी वाढली आहे. विभागातील 8 तालुक्यांमध्ये 2 ते 3 मीटरपर्यंत भूजल पातळी वाढली असून 3 मीटरपेक्षा अधिक भूजल पातळी वाशिम जिल्ह्यातील एका तालुक्यात वाढली आहे.
पाणीटंचाईला दिलासा
विभागातील भूजल पातळी वाढली असल्याने यावर्षी मार्चपर्यंत पाणी टंचाईची शक्यता फार कमी आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात उंचावर असणारी काही गावे तसेच यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यातील काही तालुक्यात भूजल काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असली तरी पाणी टंचाईची झळ बर्याच अंशी कमी बसण्याचा अंदाज भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
रब्बी पिकांना फायदा
भूजल पातळी वाढली असल्यामुळे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात गहू हरभरा, कांदा, बटाटा अशा रब्बी पिकांना त्याचा फायदा होणार आहे. शेतातील विहिरी तुडुंब भरल्या असल्यामुळे रब्बी पीक घेण्यासाठी शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - चंद्रपूर : भद्रावती तालुक्यात वाघाचा मृत्यू; करंट लावून मारण्याची शक्यता