अमरावती - राज्यात आणि विदर्भात आता मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. तर दुसरीकडे ज्या शेतकर्यांनी पेरणीपूर्व शेतांची मशागत केली नाही, त्या शेतकऱ्यांच्या शेतीची मशागत देखील आता अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतकरी आपल्या पारंपरिक बैलजोडीच्या साह्याने शेतात मशागत करताना दिसून येत आहे.
'17 जूनपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये'
मागील वर्षी जूनमध्ये पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने दुबारची पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले होते. त्यामुळे मृग नक्षत्र लागले असले तरी यंदा हे संकट येऊ नये, याकरिता 17 जून पर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असा सल्ला विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने दिला आहे.
बियाणे खरेदीसाठी बाजारात धुमशान
दरम्यान अमरावती जिल्ह्यात यंदा 7 लाख 28 हजार हेक्टरवरील खरिपाच्या क्षेत्रावर बियाणे पेरले जाणार आहे. बियाणे खरेदीसाठी सध्या बाजारात धुमशान सुरू आहे. यंदाच्या खरीप हंगामात एकूण पेरणी क्षेत्राच्या 37 टक्के म्हणजेच 2 लाख 70 हजार हेक्टरमध्ये सोयाबीन आहे. या अर्थाने दरवर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढतच आहे. परंतु परतीच्या पावसाने काढणीला आलेले सोयाबीन खराब होत असल्याने, शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर सोयाबीन मध्ये आंतरपीक महत्त्वाचे ठरत आहे. याशिवाय 2 लाख 52 हजार हेक्टर मध्ये यंदा कपाशीचे पीक प्रस्तावित आहे.
हेही वाचा - पीक कर्ज नियमित फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्ज मिळणार 0 टक्के व्याजाने