अमरावती - गणेश चतुर्थीपासून थाटामाटात गणेश उत्सव साजरा केल्यावर आता अमरावतीकर गणरायाला निरोप देत आहेत. रविवारी गणेश चतुर्दशीला बाप्पांचे विसर्जन केले जात असले, तरी गणेश चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला अर्थात शनिवारपासूनच गणपती बाप्पाच्या विसर्जनाला अमरावतीत सुरुवात झाली आहे.
शहरात तीन ठिकाणी गणरायाचे विसर्जन -
अमरावती शहरात छत्री तलाव, प्रथमेश तलाव आणि वडाळी तलाव येथे गणरायाचे विसर्जन केल्या जाते. तसेच शहरालगत वलगाव येथून वाहणाऱ्या पेढे नदीतही गणपती बाप्पांचे विसर्जन मोठ्या संख्येने केले जाते. अमरावती महापालिकेच्यावतीने छत्री तलावालगत सहा मोठे खड्डे खोदून त्यामध्ये पाणी साठवले आहे. या खड्ड्यांमध्ये गणपतीचे विसर्जन केले जाते. प्रथमेश तलाव हा वडाळी तलावाकडे जाताना एक्सप्रेस हायवे लगत खडकांच्या मधात साचलेल्या पाण्याने तयार झाला आहे. गत 15 वर्षापासून या ठिकाणी अमरावती महापालिकेच्यावतीने गणरायाच्या विसर्जनाची व्यवस्था केली जात आहे. या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी महापालिकेच्यावतीने रस्ता तयार करण्यात आला असून या संपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. वडाळी तलावात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील मूर्त्यांना शिरवण्यास बंदी असली, तरी वडाळी परिसरातील नागरिकांच्या घरातील गणरायाच्या छोट्या मूर्तींचे विसर्जन वडाळी तलावात केले जाते.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घेतली जात आहे दक्षता -
गणपती विसर्जनादरम्यान गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग होणार नाही, यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने दक्षता घेतली जात आहे. छत्री तलाव, प्रथमेश तलाव या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग ठेवण्यासह मास्क लाऊनच तलाव परिसरात प्रवेश करण्यासंदर्भात सूचनाफलक जागोजागी लावण्यात आले आहेत. यासह गणपती विसर्जनादरम्यान गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सज्ज ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा - आज अनंत चतुर्दशी, राज्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त; वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर