अमरावती - लॉकडाऊनकाळात नागरिकांना आलेल्या वाढीव विजबिलाविरोधात आज राज्यभरात भाजपाच्या वतीने ताळा ठोको व हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. अमरावतीच्या मोर्शीमध्ये माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात सुरू असलेले आंदोलन चिघळल्याने बोंडेंसह शेकडो आंदोलकांना मोर्शी पोलिसांनी अटक केली होती. नंतर काहीवेळाने त्यांची सुटकादेखील पोलिसांनी केली.
सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा चाबकाचे फटके
अनिल बोंडे यांनी वीजबिल माफी व इतर मागण्यांसाठी ताळा ठोको व हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात करण्याच्या आधी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चाबकाने मारून आंदोलनाला सुरुवात करत महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. यावेळी त्यांनी आपला मोर्शी वीजवितरण कंपनी कार्यालयाकडे नेला व त्यांनी वीजवितरण कंपनी कार्यालयाला कुलूप ठोकत मोर्शीत चक्काजाम आंदोलन करीत रस्ता अडवून धरला होता.
जोपर्यंत वीजबिल माफ होत नाही, तोपर्यंत रस्तारोको
जोपर्यंत वीजबिल माफ होणार नाही, तोपर्यंत रास्तारोको आंदोलन सुरू ठेवू, असा आक्रमक पवित्रा बोंडे यांनी घेतला होता. कोरोनाकाळात आलेल्या वीजबिलात सूट देणार असल्याची घोषणा राज्य सरकारने करून ती पाळली नाही. त्यामुळे या सरकारने जनतेचा विश्वासघात केला, असा आरोप यावेळी बोंडे यांनी केला.