अमरावती - जगाच्या नकाशावर शक्तिशाली राष्ट्र म्हणून भारताचे नाव कोरले जात आहे. येणाऱ्या काळात अमेरिका, चीन आणि रशिया या जगातील तीन प्रमुख राष्ट्रांपैकी एका राष्ट्राला मागे पाडून भारत जगातील पहिल्या तीन शक्तिशाली राष्ट्रांच्या यादीत येणार आहे. हे सर्व नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य होत आहे. त्यामुळे राष्ट्रहितासाठी यापूर्वी पाचवेळा लोकसभा निवडणूक जिंकणारे आनंद अडसूळ यांच्या 'सिक्सर'ची गरज असल्याचे मत केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी आज जाहीर सभेत व्यक्त केले.
अमरावती लोकसभा मतदार संघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आनंद अडसूळ यांच्या प्रचारानिमित्त नेहरू मैदानावर राजनाथ सिंह यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. राजनाथ सिंह म्हणाले, दिल्लीतील सत्तेचा मार्ग हा सर्वात मोठे राज्य असणाऱ्या आमच्या उत्तर प्रदेशातून जातो, हे खरे असले, तरी सत्ता स्थापनेत महराष्ट्राचे महत्व मोलाचे आहे. 1971 साली इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले, तेव्हा ससंदेत अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांचा जयजयकार केला. आज मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवला असताना विरोधक त्यांच्याबाबत संशय व्यक्त करतात, हे योग्य नाही.
सरकारने 2008 ते 2014 या काळात 25 लाख बेघरांना घरे दिली. 2014 ते 2019 या काळात आम्ही 1 कोटी 30 लाख घरे बांधून दिलीत. 2008 ते 2014 पर्यंतच्या सरकारने देशात 42 टक्के शौचालय बांधून दिलीत. आम्ही 2014 ते 2019 पर्यंत 98 टक्के शौचालय देशात बांधले. आज सर्वच क्षेत्रात देश आघाडीवर आहे, असेही ते म्हणाले.
मुंबईतील ताज हॉटेलवर 2008 मध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यानंतर सरकारने काहीच केले नाही. आज पुलवामावर हल्ला होताच पंतप्रधान मोदींनी अवघ्या काही क्षणात चोख उत्तर देण्याची भूमिका घेतली आणि 13 दिवसात पाकिस्तानातील अतिरेकी केंद्र उद्धवस्त करण्यात आली. आज देश सुरक्षित आहे. विकासाकडे झेप घेत आहे. यामुळे अडसुळांना सहव्यांदा संसदेत पाठवा, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी अमरावतीकरांना केले.
यावेळी मंचावर आनंदराव अडसूळ, पालकमंत्री प्रविण पोटे, आमदार सुनिल देशमूख, आमदार श्रीकांत देशपांडे, माजी खासदार अनंत गुढे , भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी, शिवसेनेचे सुनील खराटे आदी उपस्थित होते.