अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccination) वेगाने होत आहे. परंतु या लसीकरणाबाबत आजही अनेकांच्या मनामध्ये भीती आणि प्रश्न आहे .अशातच या लसीकरण मोहिमेदरम्यान अनेक आश्चर्याच्या गोष्टी समोर आल्या आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये लसीकरण केलेल्या व्यक्तीच्या शरीराला स्टीलच्या वस्तू चिपकत असल्याचा दावा केला होता.
दोनच दिवसांपूर्वी झारखंडमधील एका अपघातग्रस्त व्यक्तीची गेलेली वाचा लसीकरणानंतर परत आली. अशीच एक घटना अमरावतीच्या नांदगाव पेठ मध्येही समोर आला आहे. लसीकरणाच्या पंधरा दिवसानंतर डावा हात कमजोर झाला. आणि आता दुसऱ्या डोसनंतर हातच निकामी झाल्याचा दावा ५८ वर्षीय सूर्यभान राऊत यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान आरोग्य विभागाने यावर स्पष्टीकरण देत सूर्यभान राऊत यांचा दावा खोडून काढला आहे.
नांदगाव पेठ येथील शेतकरी
सूर्यभान राऊत यांनी 23 एप्रिल 2021 रोजी स्थानिक आरोग्य उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधक पहिली लस घेतली होती. ही लस घेतल्यानंतर तिथून पंधरा दिवसानंतर त्यांचा हात कमजोर पडल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर रुग्णालयात हजारो रुपये खर्च केले. परंतु हात बरा झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर सूर्यभान राऊत यांनी त्याच हातावर लसीचा दुसरा डोस घेतला. हा डोस घेतल्यानंतर तो हातच पूर्णच निकामी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. परंतु सूर्यभान राऊत यांचा दावा आरोग्य विभागाने खोडून काढला आहे.
काय म्हणतात वैद्यकीय अधिकारी
रुग्णांनी सांगितले कि पहिला डोस घेतल्यानंतर दहा पंधरा दिवसांनी हाताला मुंग्या आल्या. आणि आणखी हाताला त्रास जाणवू लागला. आता दुसरा डोस घेतल्यानंतर तीन-चार दिवसांनी त्यांचा हाताचा त्रास वाढल्याचे त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात आम्ही चौकशी केली. आम्ही त्या रुग्णांचे सर्व रिपोर्ट तपासले व एमआयआरचे रिपोर्ट तपासले. त्याच्या वेगवेगळ्या चाचण्याही तपासल्या आहे. रक्ताच्या चाचण्या तपासल्या आहे. त्यानुसार त्याला "ब्रेनस्ट्रोक" झाल्याचे दिसून येते. त्याच्या डाव्या हातावरुन पॅरालीसीस गेला असून लसीकरणाशी त्याचा काही संबंध नसल्याची प्रतिक्रिया प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ रवींद्र शिरसाट यांनी दिली.
हेही वाचा - Wardha Illegal Abortion Case : कदम रुग्णालयाच्या परिसरात पुन्हा खोदकाम सुरू; नवीन खुलासे होण्याची शक्यता