अमरावती - अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळी एक दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला आज सकाळी चार वाजता तिर्थ स्थापनेने सुरुवात झाली. यानिमित्ताने हजारो गुरूदेव भक्त अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये दाखल झाले आहे. आज दिवसभर गुरुकुंज मोझरी नगरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळपासूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमधीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे. सकाळी पाच वाजता सामुदायिक ध्यानाचा कार्यक्रम पार पडला. सामुदायिक ध्यानासाठी संत नगरीत मोठी गर्दी झाली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी विविध सुगंधी फुलांनी सजवलेली होती. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भक्तांची गर्दी पाहता अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महासमाधीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी सामुदायिक प्रार्थनेने या महोत्सवाची सांगता केली जाणार आहे.