अमरावती - शहरात 18 परदेशी नागरिक जानेवारी महिन्यापासून वास्तव्यास असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साबनपुरा येथील मारकज मशिदीत हे सर्व राहत होते. या सर्व 18 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
कोरोनाची भारतात लागण होण्यापूर्वीच हे 18 जण भारतात आले आहेत. येथील सबानपुरा परिसरात म्यानमारवरून आलेले 10 व्यक्ती ज्यात 5 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. तसेच अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेमधून प्रत्येकी एक आणि टोगोलाईन्स देशातून 6 असे एकूण 18 परदेशी नागरिकांचे अमरावतीत वास्तव्य होते. या सर्वांकडे प्रवासी व्हिसा आहे. प्रवासी व्हिसाचा वापर केवळ पर्यटनासाठी असताना हे सर्व 18 व्यक्ती संबंपुरा परिसरातील मारकज मशिदीत थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खोलपुरी गेट पोलिसांनी या सर्व 18 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
या 18 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असता त्यांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी या सर्वांना एका शासकीय इमारतीत क्वारंटाईन केले आहे. या 18 जणांना आश्रय देणाऱ्या मशीद प्रशासनाविरुद्ध मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.