अमरावती - आषाढी एकादशी निमित्त आजपासून अमरावतीच्या अकोली परिसरातील नवीन अमरावती रेल्वे स्थानकावरून पंढरपूरसाठी गाडी सुरू झाली. 17 डब्यांची गाडी नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर उभी होती. यावेळी वारकऱ्यांची प्रचंड गर्दी पाहून खासदार नवनीत राणा यांनी रेल्वे प्रशासनाकडे आणखी तीन डबे वाढवून द्यावे, अशी मागणी करताच रेल्वे प्रशासनाच्या वतीने गाडीला तीन अतिरिक्त डबे जोडण्यात आले. ही गाडी जय हरी विठ्ठलचा जयघोष करीत अकोली रेल्वे स्थानकावरून पंढरपूरकडे रवाना झाली.
हेही वाचा - MP Navneet Rana: खासदार नवनीत राणांकडून अतिवृष्टिग्रस्त भागांची पाहणी, तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी
आमदार रवी राणा यांनी दाखवली हिरवी झेंडी - नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर दुपारी दोन वाजता ही गाडी येणार असल्यामुळे खासदार नवनीत राणा या दोन वाजताच रेल्वे स्थानकावर पोहचल्या होत्या. काही कारणांमुळे ही गाडी पाच वाजता रेल्वे स्थानकावर पोहचली. तोपर्यंत खासदार नवनीत राणा यांनी रेल्वे स्थानकावर उपस्थित वारकऱ्यांची भेट घेऊन पंढरपूरच्या पांडुरंगाला माझा सुद्धा नमस्कार कळवा, असे म्हणत तुम्हाला काही अडचण असेल तर मला सांगा, असे सुद्धा विचारले.
तीन डबे जोडण्याबाबत रेल्वे प्रशासनाला सूचना - 17 डब्यांची गाडी इतक्या मोठ्या प्रवाशांसाठी अपुरी पडू शकते हे लक्षात येताच खासदार नवनीत राणा यांनी अतिरिक्त तीन डबे जोडण्याबाबत रेल्वे प्रशासनाला सूचना दिल्या. काही कामानिमित्ताने खासदार नवनीत राणा या सायंकाळी पाच वाजता रेल्वे स्थानकावरून परत गेल्यानंतर वीस डब्यांची गाडी रेल्वे स्थानकावर पोहचली. ही गाडी अकोली रेल्वे स्थानकावर पोहचल्यावर बडनेराचे आमदार रवी राणा रेल्वे स्थानकावर पोहचले आणि त्यांनी बोगीमध्ये बसलेल्या वृद्ध वारकऱ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतला. यावेळी भाजपचे नेते तुषार भारतीय हे देखील आपल्या कार्यकर्त्यांसह रेल्वे स्थानकावर पोहचले होते. सायंकाळी साडेसहा वाजता ही गाडी अमरावती रेल्वे स्थानकावरून पंढरपूरकडे रवाना करण्यासाठी आमदार रवी राणा यांच्यासह तुषार भारतीय यांनी या गाडीला हिरवी झेंडी दाखवली.