अमरावती - येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या आवारात प्रशासकीय इमारती लगत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या मृत महिलेच्या शेजारी तिची सहा महिन्याची मुलगी रडत असल्यामुळे हा प्रकार सकाळी सात वाजता उघडकीस आला.
पोलीस आणि प्राचार्य पोहोचले महाविद्यालय -
श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या परिसरात प्रशासकीय इमारतीच्या लगत लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून एका चौकीदाराने आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता मृत महिलेजवळ लहान बाळ रडत असल्याचे त्यांना आढळून आले. याबाबत चौकीदाराने लगेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकिशोर चिखले यांना माहिती दिली. प्राचार्य नंदकिशोर चिखले यांच्यासह महाविद्यालयाचे काही प्राध्यापक महाविद्यालयात आले त्यांनी याबाबत गाडगेनगर पोलिसांना माहिती देतात पोलिसांचा ताफा कृषी महाविद्यालयात पोहोचला.
दोन दिवसांपूर्वीच महाविद्यालयात आले होते राज्यपाल -
श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारती लगत एका ओट्यावर महिलेचा मृतदेह आढळून आला. अमरावती-नागपूर महामार्गालगत आतमध्ये असणाऱ्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत ही महिला रात्री कशी काय आली असावी, असा प्रश्न पोलिसांसह महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापकांना पडला. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशयारी हे दोन दिवसापूर्वीच श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणाचा साठी आले होते. याच इमारती लगत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
महिलेची ओळख पटली नाही -
ही मूर्त महिला नेमकी कोण असावी याबाबत अद्याप ओळख पटली नाही. ज्या ठिकाणी महिलेचा मृतदेह आढळून आला त्या ठिकाणी खिडक्यांची काच मोठ्या प्रमाणात पडली आहेत अतिशय अडगळीच्या ठिकाणी पडलेल्या महिलेच्या मृतदेहाजवळ तिची सहा महिन्याची चिमुकली रात्रभर थंडीत कुडकुडत होती. हा प्रकार आज सकाळी समोर आल्यावर गोकुळ बाल आश्रमाच्या संचालिका गुंजन गोळे या शिवाजी कृषी महाविद्यालयात धावून आल्या. त्यांनी लहान बाळाला स्वतःकडे घेतले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर पोलिसांनी सहा महिन्याच्या चिमुकलीला आरोग्य तपासणी करिता गुंजन गोळे यांच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा - सरकार पाडण्यासाठी नारायण राणेंनी अधिक मुदत दिल्याने त्यांचे आभार, जयंत पाटलांचा खोचक टोला