अमरावती - अमरावतीमध्ये(Amravati Violence) शनिवारी झालेल्या हिंसाचारानंतर शहरात संचारबंदी(Curfew in Amravati) लावण्यात आली. पहिल्या टप्प्यात चार दिवसांची संचारबंदी पोलीस प्रशासनाने(Amravati Police) लावली होती. त्यानंतर संचारबंदी आणखी वाढवण्यात आली आहे. परंतु या संचारबंदीत आता काही प्रमाणात शिथिलता(Curfew Relaxation) देण्यास पोलीस प्रशासनाने सुरुवात केली आहे .आजपासून अमरावतीमध्ये सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यत जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने आणि कृषी केंद्र उघडण्यास मुभा दिली आहे.
- शहरात नागरिकांची रेलचेल सुरू-
तसेच शहरातील सर्व शासकीय कार्यालय व बँका या पूर्ण वेळात सुरू राहणार आहेत. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता संचारबंदीत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून असलेल्या संचारबंदीत शिथिलता देण्यात आहे. त्यामुळे आज नागरिकांची बाहेर गर्दी दिसून आली, तर कृषी केंद्र दुकाने सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
- काय आहे प्रकरण?
त्रिपुरा येथील कथित हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ शुक्रवारी एका समूहाच्यावतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान पाच ते सात दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. त्या घटनेच्या निषेधार्थ काही संघटनांनी शनिवारी अमरावती शहर बंदची हाक दिली होती. त्यामुळे शनिवारी अनेक संघटना या रस्त्यावर उतरल्या होत्या. याच दरम्यान अमरावतीमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. यावेळी जाळपोळ, दगडफेक देखील झाली होती. तर शहराच्या एका भागामध्ये दोन समूहाचे लोक आमने-सामने आल्याने मोठा हिंसाचार झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संचारबंदी लावण्यात आली आहे.