अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे साडेसातशे वर्षांपूर्वीचे खंडेश्वराचे भव्य मंदिर आहे. श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीला हजारो भाविक श्रद्धेने या मंदिरात येतात. निसर्गरम्य परिसरात वसलेले हे ऐतिहासिक मंदिर दगडांनी बांधले आहे. या मंदिरातील कोरीव शिल्प आणि रेखीव बांधकाम हे अतिशय सुंदर असून, येणारे भाविक रचना पाहून अगदी थक्क होतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या कळसावर कधीही कावळा किंवा कबूतर बसत ( crow dove does not sit on summit ancient mahadev khandeshwar temple ) नाहीत.
असा आहे मंदिराचा इतिहास - खंडेश्वराचे हे पुरातन मंदिर रामदेवरायाच्या कारकिर्दीत शके 1177 मध्ये आनंद संमत सरी म्हणजे इसवी सन 1224 ते 55 या काळात बांधण्यात आले आहे. हेमाडपंथी वास्तुशिल्पकलेच्या उत्कृष्ट कलाकृती या मंदिराच्या दगडी भिंतीवर करण्यात आले आहे. या मंदिरासाठी विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या विटांची जोडणी करण्यात आली. या विटा पाण्यावर तरंगतात असे म्हटले जाते. रामदेवरायाचा पंतप्रधान हेमांद्री पंत यांनी हे पुरातन शिवालय बांधल्याची नोंद मंदिरावर देवनागरी लिपीत लिहिलेल्या शिवलेखात अंकित आहे. कवडीन्य मुनींच्या शिष्यात खंड्या नावाचा शिष्य शिष्य होता. याच खंड्याने स्थापन केलेल्या महादेव म्हणजेच खंडेश्वर होय. या खंडेश्वराच्या कृपा छत्राखाली नांदणारे गाव म्हणजे नांदगाव खंडेश्वर आहे, असे सुद्धा या परिसरातील रहिवासी सांगतात.
असे आहे मंदिराचे वैशिष्ट्य - मंदिराच्या पूर्वेकडील दर्शनी दारावर प्राचीन शिल्पकारांची नक्षीकांत शिल्पे आजही लक्ष वेधून घेतात. या मंदिरात खोल गाभाऱ्यात प्राचीन शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. शिवलिंगाच्या गाभाऱ्याच्या उत्तरेकडे शिव पार्वतीचे मंदिर आहे. या ठिकाणी शिवाने पार्वतीला मांडीवर घेतले असल्याची मूर्ती आहे. तर, पश्चिमेकडील मंदिरामध्ये नृसिंहाची मूर्ती हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन आपल्या तीक्ष्णनाथांनी त्याचे पोट वाढून वध करताना दिसत आहे. या तीनही देवळांना जोडणारा गाभारा एकच असून, तो अतिशय प्रशस्त असा आहे. शिव मंदिराच्या या गाभाऱ्यात मध्यभागी शिवाचे वाहन नंदी भाविकांना आकर्षित करतो अशा भव्य स्वरूपात स्थापन करण्यात आला आहे. देवळाच्या सभोवताली पक्क्या बांधणीचा दगडी परकोट आहे. मंदिराचे महाद्वार दक्षिणेकडे असून, त्यासमोर अष्टभुजा देवीचे मंदिर आहे. पूर्वेकडे उंच अशी दीपमाळ असून, त्यासमोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पूर्ण कृती पुतळा काही वर्षांपूर्वीच बसवण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत पावसाळ्यात हे मंदिर कधीही गळले नाही.
बांधकामात मंदिराची चावी - नांदगाव खंडेश्वर येथील मंदिराच्या विविध वैशिष्ट्यांपैकी या मंदिराच्या बांधकामामध्ये दगडांच्या आड एक चावी आहे. ही चावी जर काढली तर मंदिर कोसळेल असे सांगण्यात येते. या चावीची देखील भाविक पूजा करतात या चावीला हात लावला तर ती हलते. मात्र, ती त्या दगडांमधून निघत नाही, अशी माहिती मंदिरातील पुजारी अरविंद फुसे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. मंदिराची पाहणी करण्यासाठी काही वैज्ञानिक आले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार मंदिरावर वीज पडू नये यासाठी केलेली खास व्यवस्था म्हणजे ही चावी असल्याचे त्यांनी सांगितले होते, असे देखील अरविंद फुसे म्हणाले.
मंदिराच्या कळसावर कावळा, कबूतर बसत नाही - नांदगाव खंडेश्वर येथील खंडेश्वराच्या भव्य मंदिराच्या कळसावर कधीही कावळा तसेच कबूतर बसत नाहीत, अशी आश्चर्यकारक माहिती येथील पुजारी अरविंद फुसे यांनी दिली. या कळसावर केवळ रान पोपटांचा थवा नियमित असतो. मात्र, मंदिराच्या कळसापर्यंत आजपर्यंत कधीही कावळा किंवा कबूतर गेले नाहीत.
काशी घडल्याचे मिळते पुण्य - खंडेश्वर मंदिरासह लगतच्या बोंडेश्वर आणि कोंडेश्वर या मंदिरातील शिवलिंगाचे एकाच दिवशी दर्शन घेतले, तर काशी घडल्याचे पुण्य मिळते, असे सांगितले जाते. खंडेश्वर मंदिराच्या बांधकामाची वीट पाण्यावर तरंगते. ज्या टाक्यांमध्ये ही वीट तरंगते ते टाके आज देखील देखील येथे उपलब्ध असल्याची माहिती नांदगाव खंडेश्वर येथील रहिवासी प्रदीप जोशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. या मंदिराच्या कळसालगत भुयारा सारखे स्थान तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी पूर्वी ऋषीमुनी होम हवन करीत असत, अशी माहिती देखील या परिसरातील भाविक सांगतात.
हिरव्या गार झाडांनी बहरला परिसर - नांदगाव खंडेश्वर या गावापासून काहीशा उंचावर खंडेश्वराचे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिर परिसरात वर्ड, उंबर, कडुलिंब, आंबा ही वृक्ष मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर घालीत आहेत. मंदिराच्या आवारात बकुळीच्या फुलांचा सडा सर्वत्र भरलेला दिसतो मंदिराचा संपूर्ण परिसर अतिशय शांत आणि हिरव्यागार झाडांनी भरला असल्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना आगळी वेगळी ऊर्जा या ठिकाणी प्राप्त होते, असा अनुभव येतो.
हेही वाचा - Chitaroli Nagpur :...अन् चितारओळी झाली कलाकारांची वसाहत; 'असा' आहे 300 वर्षांचा भोसले कालीन इतिहास