अमरावती- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटण्यासाठी चक्क कोरोना रुग्ण जिल्हाधिकारी कार्यालयात धडकल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या रुग्णाला अडविण्याचा प्रयत्न केला असता, मी कोरोनाग्रस्त असून मला कोरोनाबाबत जिल्ह्यातील खरी परिस्थिती आरोग्यमंत्र्यांसमोर मांडायची आहे, असे त्याचे म्हणणे होते.
शुक्रवारी आरोग्यमंत्री बचतभवन येथे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यासाठी येणार असल्याने हा व्यक्ती थेट पत्रकार परिषदेच्यास्थळी पोचला. दरम्यान पोलिसांनी त्याला हटकले असता, मला हात लावू नका, मी कोरोना पॉझिटिव्ह असून मला कोरोनाबाबत अमरावती शहर प्रशासनाचे जे ढिसाळ काम आहे, त्याची माहिती आरोग्यमंत्र्यांना द्यायची आहे. माझी आईसुध्दा कोरोना पॉझिटिव्ह असून आम्हाला शासकीय रुग्णालयात बेड नाही, असे सांगण्यात आले. मी खासगी रुग्णलयात खर्च करू शकतो, मात्र गरीब रुग्णांनी काय करावे याबाबत आरोग्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचे त्याचे म्हणणे होते.
या कोरोना रुग्णाला पकडण्याचे धाडस पोलिसांनी केले नाही. तो जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बाकावर बसून आरोग्यमंत्री येण्याची वाट पाहत होता. दरम्यान त्याला रुग्णालयात न्यायला रुग्णवाहिका बोलविण्यात आली. मात्र त्याने आरोग्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका घेतली. दरम्यान आरोग्यमंत्री पत्रकार परिषदस्थळी पोचले असता पोलिसांनी त्या व्यक्तीस जागेवरून हलु दिले नाही. पत्रकार परिषद आटोपल्यावर आरोग्यमंत्री निघून गेले आणि त्यानंतर तो स्वतः रुग्णवाहिकेत बसायला तयार झाला. या संपूर्ण प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काहीवेळ गोंधळ उडाला होता.