अमरावती : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत अमरावती जिल्ह्यात मागील पाच वर्षापासून 'विकेंद्रित सोलर चरखा समूह कार्यक्रम' हा नाविन्यपुर्ण पथदर्शी प्रकल्प (Cotton to fashion project in Amravati) राबविण्यात येत आहे. या प्रकल्पा अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील २१ गावामध्ये २५० महीलांना सोलर चरखे उपलब्ध करून देण्यात आले आहे. कस्तुरबा सोलर खादी महिला समितीमार्फत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांपासून कापूस खरेदी करून त्यापासून कच्चा माल तयार करतात. विविध गावातील चरख्यावर सुत कताई करून, त्यापासून सौर खादी कापड व विविध सौर खादी उत्पादनाची निर्मिती केली जाते. डाईंग, ब्लिचिंग, कॅलेंडरिंग, ब्लॉक प्रिंटिंग, यासह विविध प्रकारच्या कपड्यावर प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी केली जाते.World Cotton Day 2022
देशातील एकमेव प्रकल्प : संपूर्णतः महिलांनी महिलांसाठी राबविण्यात आलेला हा देशातील एकमेव प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये अमरावती जिल्हातील ३०० पेक्ष्या जास्त महीलांना कायम स्वरूपी रोजगार प्राप्त झाला असून; हा प्रकल्प पूर्णतः सामाजिक भावनेतून 'ना नफा ना तोटा' या तत्वावर राबविण्यात येत आहे. त्यामध्ये अमरावती जिल्हयातील धारणी तालुक्यातील १०० आदिवासी महिलांचा समावेश आहे. तसेच धारणी तालुक्यातील मांडू या गावी विणकाम केंद्र स्थापन केले आहे. तेथील १५ पेक्षा जास्त युवक - युवतींना उदरनिर्वाहाकरिता कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचा उद्देश संस्थेचा आहे.
या वस्त्रांची होते निर्मिती : लहान मुलांचे सर्व प्रकारचे कपडे, पुरुषांचे शर्ट, जॅकेट, दूपट्टा, टॉवेल्स तर महिलांच्या वस्त्रामध्ये पंजाबी सूट, साड्या, स्कार्फ, ओढणी यासह इतरही विविध प्रकारचे कपडे येथे तयार होतात.
शासनानेही उपलब्ध करून दिले आर्थिक साहाय्य : या प्रकल्पाला राज्य शासन उद्योग विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रमा अंतर्गत अमरावती एम आय डी सी येथे सामुहिक सुविधा केंद्र स्थापन केले आहे. या सामुहिक सुविधा केंद्रामध्ये ८० टक्के शासनाचा सहभाग आहे.World Cotton Day 2022