अमरावती : यंदा कापसाला चांगलाच भाव मिळत आहे. अनेक ठिकाणी कापूस आठ हजार रुपये क्विंटलच्या घरात पोहोचला आहे. मात्र दर चांगला मिळत असला तरी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाचे उत्पन्न घटल्याने या दरवाढीचा शेतकऱ्यांना काहीही फायदा होत नसल्याचेच चित्र दिसत आहे.
बोंडअळीने हिरावला घास
मागील वर्षी कपाशी पिकावर आलेल्या बोंडअळीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर घाव घातल्यानंतर या वर्षी तरी कापसाचे उत्पादन चांगले होईल ही अशा शेतकऱ्यांना होती. मात्र यंदाही बोंड अळीच्या प्रादुर्भावाने कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी सुरुवातीला पश्चिम विदर्भात झालेला अति पाऊस यामुळे कापूस उत्पादनात घट झाली असतानाच आता पुन्हा सलग दुसर्या वर्षीही बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने यंदाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाले आहे. बोंड अळी येऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी केली असली, तरी मात्र बोंड अळी थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे कापसाचे भाव वाढले असले, तरी घरी मात्र कापूस नाही. त्यामुळे कापसाच्या भाववाढीचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नसल्याचेच चित्र दिसून येत आहे.
मागील वर्षी बोंड अळीची कल्पना नव्हती
अमरावती जिल्ह्यातील शिवणगाव येथील कापूस उत्पादक शेतकरी रामकृष्ण डोळस सांगतात, माझ्याकडे एकूण बारा एकर शेती आहे. त्यापैकी मी सहा एकरवर कपाशी लावली आहे. या वर्षी त्यांच्या कपाशीवर मोठ्या प्रमाणावर बोंडअळी आली आहे. त्यामुळे आता ही कपाशी शेतातून उपटून टाकायचा त्यांचा विचार सुरू आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी त्यांनी भरपूर फवारणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. मागील वर्षी बोंड अळीची कल्पना नव्हती. परंतु यावर्षी काही प्रमाणात कल्पना असल्याने खर्च केला. परंतु त्याचं काहीच फलीत झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं. मागील वर्षीच्या नुकसानभरपाईचे पैसे जमा झाले नसल्याचं त्यांनी म्हटलं.
निम्यातहून कमी कापसाचे उत्पादन
शेतकरी रामकृष्ण डोळस सांगतात, ज्याप्रमाणे यावर्षी खर्च केला, त्यानुसार यंदा एका एकराला किमान 15 क्विंटल कापूस होईल ही अपेक्षा होती. त्यामुळे सहा एकरात 90 क्विंटल कापूस अंदाजे व्हायला पाहिजे होता. परंतु तो कापूस निम्म्यापेक्षाही कमी आला आहे. केवळ पस्तीस क्विंटल कापूस घरी आल्याचं त्यांनी सांगितलं. आठ हजार भाव आहे, पण उत्पादन नाही. मग त्या भावाचा आम्हा शेतकऱ्यांना काय फायदा होणार असेही त्यांनी म्हटलं.
यामुळे वाढत आहे बोंड अळीचा प्रादुर्भाव
यंदा राज्यभर सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. एवढेच नाही तर हा पाऊस लांबला होता. त्यामुळे कापूस पिकाचा हंगाम अद्यापही सुरूच आहे. लांबलेल्या हंगामामुळे बोंड अळीला अखंडित अन्नपुरवठा हा सुरूच आहे. त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव हा वाढतच आहे. बोंडअळीमुळे कापसाचे तर नुकसान होत आहेच. शिवाय शेतजमिनीवरही याचा परिणाम होतो आहे. आगामी हंगामातील पीक उगवण तसेच पीक वाढीवरही या बोंड अळीचा प्रादुर्भाव कायम राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेली पिके शेतातून काढून बांधावर टाकणे गरजेचे असल्याच कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
फरदळ उत्पादनामुळे अधिकचे नुकसान
फरदडमुळे कपाशीच्या दीर्घकाळ वाढणाऱ्या संकरीत वाणांची लागवड होते. या वाणांवर गुलाबी बोंड अळीच्या जास्त पिढ्या पूर्ण होतात. परिणामी या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी सतत अन्न पुरवठा होत असल्याने व जीवनक्रम एकमेकांत मिसळल्याने त्यांच्या संख्येत वाढ होते. फरदड जास्त काळापर्यंत कच्च्या कपाशीची जिनिंग मध्ये आणि व्यापारी संकुलात साठवण केली जाते. त्यामुळे गुलाबी बोंड अळी आगामी हंगामात येण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. कापूस पिकाच्या फरदळमुळे उत्पादनात वाढ होणार असली तरी आपण एक प्रकारे बोंड अळीच्या वाढीस खत-पाणी घालत असतो.
वाढीव उत्पादनापेक्षा रब्बी हंगामातील पेरणी उत्तम
कापसातून अधिक उत्पादन मिळावे या अनुषंगाने शेतकरी कापसाची फरदड घेत असतात. त्यामुळे बोंड अळीचा प्रादुर्भाव जात नाही. अस कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे .त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची काढणी त्या क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करणे फायद्याचे राहणार आहे. त्यामुळे पीक पद्धतीमध्ये बदल होईल आणि बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढणार नाही. रब्बी हंगामात हरभरा, गहू ,कांदा आदी पिकांची पेरणी शेतकऱ्यांना करता येते.
पश्चिम विदर्भात किती हेक्टर वर कापसाची पेरणी?
विदर्भातील शेतकरी हे सर्वाधिक कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन घेत असतात. यावर्षी पश्चिम विदर्भात 10 लाख 16 हजार 431 हेक्टर शेतजमिनीवर शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी केली होती. मध्यंतरी पावसामुळे पश्चिम विदर्भातील 1 लाख 1 हजार 554 हेक्टर वर कापसाचे नुकसान झाले होते.यामध्ये सर्वाधिक 67 हजार हेक्टरवर अमरावती जिल्ह्यात कापसाचे नुकसान झाले होते.