अमरावती - मागील दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत. वरुड तालुक्यात देखील पाऊस सुरू आहे. यातच शासकीय जिनिंगमध्ये शेतकऱ्यांनी शेकडो गाड्यांमधून विकायला आणलेला कापूस ओला झाल्याने तसाच पडून होता. पणन महासंघाने हा कापूस खरेदी करणे थांबवले होते. परंतु, संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहामुळे अखेर कापूस खरेदी सुरू करण्यात आली.
हेही वाचा... केरळ हत्तीण प्रकरणानंतर हिंगोलीतील एक धक्कादायक वास्तव समोर; विजेचा शॉक देऊन केली जातेय रानडुकरांची शिकार
अमरावती जिल्हातील हजारो शेतकऱ्यांचा कापूस हा घरीच पडून आहे. परंतु, शासनाच्या धिम्या गतीमुळे सर्व कापूस खरेदी होऊ शकत नाही. त्यातच दिवसात फक्त ३० ते ४० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जातो आहे. त्यात आज (गुरुवार) वरुड येथील संपूर्ण जिनिंगने कापूस खरेदी करण्यास नकार दिला आणि शेतकऱ्यांना माघारी जाण्यास सांगितले. शेकडो शेतकरी मागील दोन दिवसांपासून कापूस विक्रीसाठी रांगेत उभे होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी परत जा म्हटल्यानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पुन्हा कापूस खरेदी करण्यास सुरुवात झाली.