अमरावती - विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांकडून अवाच्या सवा परीक्षा फी वसूल केली जात असल्यामुळे आज भाजपा युवा मोर्चाकडून विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख यांच्या कक्षात आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, कर्मचाऱ्यांनी आधीच या कक्षाला कुलूप लावून ठेवले होते. दरम्यान, हे कुलूप तोडण्याचा प्रयत्न भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला. परंतु, प्रयत्न करूनही कुलूप तोडल्या न गेल्याने शेवटी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी कुलसचिवांच्या कक्षाला कुलूप ठोकले असून आंदोलन सुरू केले.
हेही वाचा - नीती आयोगाचे प्रमाणापत्र मिळालेले विदर्भातील एकमेव वाचनालय
संपूर्ण देशामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक त्रस्त असताना शैक्षणिक विभागावरसुद्धा त्याचा परिणाम होत आहे. सर्वात जास्त परिणाम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर होत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पिळवणुकीतून विद्यार्थ्यांना दूर करण्यासाठी शिक्षण संस्थांनी काढलेल्या नियमावलीचे पालन महाविद्यालयांकडून होत नसल्याचे दिसत आहे, असा आरोप भाजपा युवा मोर्चाचे सोपान कणेरकर यांनी केला.
विद्यापीठ हे महाविद्यालयांवर नियंत्रण करणारी एक संस्था आहे. परंतु, कुठल्याच प्रकारे अमरावती विद्यापीठाचे महाविद्यालयांवर नियंत्रण दिसत नाही. त्यामुळेच, विद्यार्थ्यांवर मोठ्याप्रमाणात दडपशाही होताना दिसत आहे. सप्टेंबर २०२० मध्ये यूजीसी आणि एआयसीटीईने काढलेल्या परिपत्रकात, ज्या विद्यार्थ्यांनी अॅडमीशन घेतले आहे, त्याचे प्रवेश शुल्क हे चार टप्प्यामध्ये देण्यात यावे. जे अतिरिक्त शुल्क आहे, जसे लाईब्ररी, जिम, सायकल स्टँड व ट्युशन शुल्क व्यतिरिक्त जो शुल्क आहे, तो अतिरिक्त शुल्क माफ करण्यात यावे अशी नियमावली आहे. तरी सुद्धा या नियमावलीचे पालन अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रात येणारे महाविद्यालये करताना दिसून येत नाही, असे कणेरकर म्हणाले.
वारंवार सांगून जर महाविद्यालय ऐकत नाही तर त्यांची संलग्नता विद्यापीठाने रद्द करावी. विद्यार्थ्यांकडून त्यांनी प्रवेशशुल्क पूर्ण भरावे यासाठी त्यांची पिळवणूक होत आहे. तसेच, त्यांच्यावर दडपशाहीसुद्धा होताना दिसत आहे, असा आरोप आंदोलकानी केला.
हेही वाचा - अमरावती विद्यापीठाच्या परीक्षांना सुरूवात; कोरोनामुळे होणार ऑनलाइन