अमरावती - जनगणना केली असताना केंद्र सरकार ओबीसींची आकडेवारी जाहीर करत नाही. खरं तर ओबीसींबाबत पुळका दाखवणारे भाजप केवळ राजकारण करीत आहे. ओबीसींचा खरा घात भाजपने केला असून आता ओबीसींसाठी तेच मोर्चा काढत आहेत. संवैधनिक व्यवस्थेला, मागासवर्गीयांच्या अधिकाराला संपविण्याचे काम भाजपने केले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अमरावतीत केला. दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या नाना पटोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित केले.
हेही वाचा - अमरावतीत दुचाकी आणि गाडीची झाली धडक; दोन ठार तर एक जखमी
काँग्रेसला लोकशाहीवर विश्वास
2024 ची लोकसभा निवडणूक युपीए शरद पवार यांच्या नेतृत्वात लढणार आल्याचे बोलले जात असल्यासंदर्भात नाना पटोले यांनी खुलासा केला. पंतप्रधान पदाचे उमेदवर हे राहुल गांधीच राहतील. कॅल्क्युलेशन आणि मॅनिक्युलेशन कॉंग्रेसच्या व्यवस्थेत नसून आम्ही लोकांच्या आशीर्वादाने सत्तेत येऊ. काँग्रेसचा विश्वास हा लोकशाही व्यवस्थेवर आहे, असे नाना पटोले म्हणाले.
आम्ही सोबत राहून पाठीत सुरा खुपसणारे नाही
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार आहे. तसे त्यांनी जाहीरही केले आहे. काँग्रेसपक्ष हा कोणाच्या सोबत राहून त्याच्या पाठीत सुरा खुपसणारा पक्ष नाही. 2024 ला वेळ आहे, मात्र त्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
आज लोकांचा जीव वाचवणे हेच महत्वाचे काम
महामारीच्या संकटात लोकांचा जीव वाचविणे हेच सध्या काँग्रेसचे महत्वाचे काम आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आमची फसवणूक केली. कोरोनामुळे अनेकांचे प्राण गेलेत. ही परिस्थिती पाहून आमचे मन दुखते, रडते मात्र लोकांसमोर आम्हला रडता येत नाही. मात्र, या महामारीत ज्या व्यक्तीच्या चुकीमुळे लोक दगावले तीच व्यक्ती सर्वांसमोर रडते, असे म्हणत नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
हेही वाचा - पहिल्याच पावसामुळे समृद्धी महामार्गानजीकच्या शेतात तुंबले पाणी; शेतांना तलावाचे स्वरुप