अमरावती - शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मागील पंधरा दिवसांपासून भाजप आवाज उठवत आहे. अमरावतीसाठी मदतीचा शासन निर्णय विलंबाने काढला. त्यातही अचलपूर, वरुड, मोर्शी, चांदुर बाजार तालुका वगळण्यात आला. त्यात संत्रा गळून पडला आहे. महावितरण शेतकऱ्यांच्या मागे लागले आहे, वीज कापणी सुरू आहे, त्यामुळे रब्बी पीकही शेतकऱ्यांना घेता येणार नाही. त्यामुळे, त्यांची यंदाही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे भाजप नेते डॉ. अनिल बोंडे म्हणाले.
हेही वाचा - महिला आयोग व बालहक्क आयोगाचे कार्यालय विभागीय आयुक्तालयाच्या इमारतीत स्थलांतरित करा - मंत्री ठाकूर
झुणका भाकर खाऊन महाविकास आघाडी सरकारचा निषेध
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मदत न केल्यास गावात फिरणाऱ्या मंत्र्यांना शेतकरी रूमन्याने बडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील बोंडे यांनी सरकारला दिला आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांसाठी भाजपकडून मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी झुणका भाकर खाऊन भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.
शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली नाही
राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केली, मात्र दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर असताना देखील शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली नाही. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तोकडी आहे, असा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करत काळी दिवाळी साजरी करण्यात आली.
..या आहेत मागण्या
दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करा, अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, संत्रा गळती होत असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या, ही मागणी आंदोलन कर्त्यांनी करत चक्क जिल्हाधिकारी कार्यालयावर झुणका भाकरचे जेवन करत राज्य सरकारचा निषेध केला. माजी कृषी मंत्री अनिल बोंडे व भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा - अमरावतीत 'मोटोमॅन' देणार अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान; राज्यातला पहिलाच उपक्रम