अमरावती - कोरोनाकाळात आलेले वीजबिल माफ करणे शक्य नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केल्यावर राज्य सरकारविरोधात भाजपने राज्यभर आंदोलन केले. यात अमरावतीत राज्य शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. भाजप कार्यकर्त्यानी राजकमल चौकात वीजबिलाची होळी करून राज्य शासनाचा निषेध नोंदवला.
नेहरू मैदानातून निघाली प्रेतयात्रा
भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर यांच्या नेतृत्वात राजकमल चौकात वीजबिलाची होळी केली जात असताना काही कार्यकर्त्यानी नेहरू मैदान येथील राजकमल चौकापर्यंत राज्य शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.
पोलिसांनी जप्त केला पुतळा
राजकमल चौकात भाजप कार्यकर्त्यानी तिरडीवर बांधून आणलेला पुतळा पोलिसांनी मोठ्या शिताफीने जप्त केला. यावेळी राजकमल चौकात बराच गोंधळ उडाला. पोलिसांनी तिरडीसह जप्त करून गाडीत टाकला. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला.
हे सरकार पलटूराम
कोरोनाकाळात आलेले अतिरिक्त वीजबिल माफ केले जातील. वाढीव वीजबिलात कपात केली जाईल, अशी घोषणा शासनाने केली होती. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे पलटूराम सरकार असून, दिलेले आश्वासन हे सरकार पळत नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिल माफ करणं अशक्य असल्याचे स्पष्ट करून नागरिकांना आशेवर ठेऊन त्यांची फसवणूक केली असल्याचे भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर म्हणाले.