अमरावती - बांगलादेशात विदर्भातील संत्राला चांगली मागणी आहे. परंतु, बांगलादेश सरकारने संत्र्याच्या आयात शुल्कात गेल्या पाच वर्षांमध्ये दोन वेळा वाढ केल्यामुळे त्याचा फटका विदर्भातील संत्रा बागायतदार शेतकऱ्यांना बसत आहे. पश्चिम बंगाल मार्गे रस्ते वाहतूक करून त्या माध्यमातून विदर्भातील संत्री बांगलादेशात पोहचवली जात आहे. पूर्वी आयात शुल्क दर 31 रुपये प्रतिकिलो होते, ते आता 38 रुपये प्रति किलो इतका झाले आहे. याचा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
हेही वाचा - तहसीलदारांच्या तत्परतेने अपघातग्रस्ताला मिळाले उपचार: राष्ट्रीय महामार्गावरील घटना
बांगलादेश सरकारने लावलेल्या आयात शुल्काने संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडला. शेतकऱ्यांच्या मदतीला वरुड, मोर्शीचे व शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार आलेत. त्यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत भेटी घेतल्या. आयात शुल्क संदर्भात शरद पवार यांनी बांगलादेश सरकारसोबत चर्चा करून पत्रव्यवहार केला आहे. बांगलादेश सरकारने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शरद पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या व परिस्थितीची माहिती देण्यात आली. लवकरच मार्ग निघणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितली.
सरकारला तोडगा काढण्याची मागणी
याबाबत संत्रा उत्पादक शेतकऱ्याची प्रतिक्रिया जानून घेतली असता त्यांनी सरकारकडे यावर तोडगा काढण्याची मागणी केली. कारण संत्र्याची परिस्थिती आधीच बिकट आहे. त्यात आता बांगलादेश सरकारच्या शुल्क वाढीमुळे संत्रा परदेशी जाणार नाही, अशी भीती त्यांना सतावत आहे. कारण इथे बाजार पेठ नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांचा फायदा होणार असून विदेशात संत्रा पाठवण्याचा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्ग बंद झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भातील संत्र्याला बांग्लादेशात मागणी
संपूर्ण विदर्भात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रात संत्र्याच्या बागा आहेत. त्यातील 95 हजार हेक्टर संत्रा बागायता या केवळ अमरावती जिल्ह्यात आहे. विदर्भाची संत्री नागपुरी संत्रा या नावाने ओळखल्या जाते. या संत्र्याची टिकण्याची क्षमता कमी असल्याने इतर देशातून मागणी त्याला कमी आहे. परिणामी निर्यातही कमी आहे. मात्र, शेजारच्या बांगलादेशात या संत्र्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे, दर वर्षी विदर्भातला लाखो टन संत्रा हा बांगलादेशमध्ये विकल्या जातो.
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांगलादेश ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. वार्षिक उत्पादनाच्या दोन तृतीयांश सुमारे अडीच लाख टन संत्रा दरवर्षी बांगलादेश येथे निर्यात करण्यात येतो. या माध्यमातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे . अमरावतीच्या वरुड, मोर्शी, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, अचलपूर या तालुक्यांमध्ये संत्राचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. येथील संत्रा हा बांगलादेशमध्ये जात असतो, परंतु आता बांगलादेश सरकारने आयात शुल्क मोठ्या प्रमाणावर वाढवल्याने याचा फटका थेट संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.
राज्य आणि केंद्र सरकारने बांगलादेश सरकारशी चर्चा करण्याची मागणी
राज्य आणि केंद्र सरकारने समन्वय साधून बांगलादेश सरकारशी चर्चा करावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. बांगलादेशने वाढवलेल्या शुल्काबद्दल राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी समन्वय साधून बांगलादेश सरकारशी चर्चा करावी, तसेच हे वाढलेले आयात शुल्क मागे घ्यावे, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली.
हेही वाचा - किडनीसाठी पतीकडून पत्नीचा छळ; अमरावतीच्या वरूड तालुक्यातील घटना