अमरावती - राज्यमंत्री बच्चू कडू हे सध्या दिल्लीतील आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकीने दिल्लीला निघाले आहेत. आज भारत बंद असल्याने ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सहभाग नोंदवत महामार्गावर चक्काजाम केला.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये मगील 12 दिवसांपासून शेतकरी जमले आहेत. पंजाब, हरयाणा, राजस्थानसह देशभरातून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमावर्ती भागात ठिय्या दिला आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज 'भारत बंद'ची हाक देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे.
![bacchu kadu in madhya pradesh](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-am-01-amravati-10016_08122020153210_0812f_1607421730_373.jpg)
मध्यप्रदेशातील शिवपुरी महामार्गावरही हजारो शेतकऱ्यांनी आंदोलन करत रस्ता रोखून धरला होता. यावेळी दिल्लीला जाणाऱ्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही आंदोलनात उडी घेत चक्काजाम केला. यावेळी बच्चू कडू यांनी केंद्र सरकारने लागू केलेले शेतकरी विरोधी कायदे तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. तसेच सरकारला डाकू असे संबोधले.