अमरावती - नाशिक जिल्ह्यातील लासलगावचा लाल कांदा ( Amravati Lasalgaon Red Onion ) हा प्रसिद्ध आहे. परंतु या लाल कांद्याचे उत्पादन विदर्भात किंवा अमरावती जिल्ह्यात सहसा घेतलं जात नाही. कारण अमरावती जिल्ह्यात रब्बी हंगामात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. पण अनेकदा मेहनत करूनही शेतकऱ्यांचा कांदा काढणीला आला की अवकाळी पावसाचा तडाखा बसतो आणि हाती आलेले कांद्याचे पीक शेतकर्यांच्या हातून निघून जाते. यावर उपाय म्हणून आता अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापुस तळणी येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने यावर्षी पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यातील लासलगावच्या लाल कांदा लागवडीचा प्रयोग केला आहे. पहिल्याच वर्षी राजेश मळसने या शेतकऱ्याचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. केवळ एक एकरात 40-50 क्विंटल नव्हे, तर चक्क 90 क्विंटल लाल कांद्याचे या शेतकऱ्याने विक्रमी उत्पादन घेऊन एक नवा विक्रम केला आहे. त्यामुळे या प्रयोगशील शेतकऱ्याची चर्चा पंचक्रोशीत होऊ लागली आहे.
खरीप हंगामात लाल कांद्याची लागवड -
दरवर्षी शेतकरी या ना त्या कारणाने संकटात सापडतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. परंतु शेती आधुनिक पद्धतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने केली, तर शेतकऱ्यालाही काही ना काही फायदा होतो, असे अनेक उदाहरणे आहेत. अमरावती जिल्ह्यातील कापूस तळणी येथील राजेश मळसणे हे मागील अनेक वर्षापासून आपल्या शेतात रब्बी हंगामातील पांढऱ्या कांद्याची लागवड करत होते. परंतु अनेकदा अवकाळी पावसाने या कांद्याला फटका बसत होता. परंतु त्यांनी या वर्षी नाशिक जिल्ह्यातील लासलगावचा लाल कांदा लावण्याचा निश्चय केला होता. यावर्षी त्यांनी एक एकर शेतीवर खरीप हंगामात लाल कांद्याची लागवड केली होती. शेतात गोमूत्र भरपूर शेणख गुणवत्तापूर्ण बियाणे, वेळेवर अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन, कीटकनाशकांचा योग्य वेळी वापर अशा त्रिसूत्रीच्या माध्यमातून तसेच वेळोवेळी फवारणी करून त्यांनी या वर्षी एका एकरात 90 क्विंटल लाल कांद्याच विक्रमी उत्पादन घेतले आहे. अमरावती जिल्ह्यात लालकांद्याचे उत्पादन घेणारा मी पहिला शेतकरी असल्याचा राजेश मळसने अभिमानाने सांगतात.
लाल कांद्याची यशस्वी शेती -
राजेश मळसने यांनी एक एकर वरील कांदा पिकासाठी जवळपास 53 हजार रुपये खर्च केले. त्यातून त्यांचे उत्पादन 1 लाख 53 हजार रुपयांचे झाले. 17 रुपये किलोप्रमाणे त्यांनी हा कांदा आपल्या शेतातून विकला खर्च वजा जाता निव्वळ एक लाख रुपयांचा नफा त्यांना मिळाला आहे. राजेश मळसणे यांच्या या यशस्वी प्रयोगाने मागे कृषी विभागाचा मोठा वाटा आहे. येथील कृषी सहाय्यक मारुती जाधव यांनी वेळोवेळी राजेश मळसने यांच्या शेताची पाहणी केली. त्यांना विविध औषधांची माहिती दिली. खतांचे नियोजन फवारनी नियोजन कसे करावे, शास्त्रीय पद्धतीने नियोजन कसे करावे, अशी माहिती मारुती जाधव यांनी त्यांना दिली. कृषी विभागाच्या या सल्ल्यानुसार शास्त्रीय पद्धतीने राजेश मळसने यांनी कांदा पिकाचे नियोजन केले आणि खरीप हंगामात त्यांनी उल्लेखनीय उत्पादन घेतले. शेतकऱ्यांवर सातत्याने संकटे येत असतात परंतु त्यातूनही मार्ग काढण्यात अनेक शेतकरी यशस्वी ठरले आहे. त्या पैकीच एक म्हणजे राजेश मळसने ज्या अमरावती जिल्ह्यात पांढरा कांदा शिवाय दुसऱ्या कांदा शेतकऱ्यांकडून पिकाला जात नव्हता. त्या अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या हिमतीने व धाडसी निर्णय घेत मेहनतीच्या जोरावर राजेश मळसने यांनी लाल कांद्याची यशस्वी शेती केली आहे. इतर शेतकऱ्यांनीही असा प्रयोग केल्यास त्यांनाही चांगले उत्पादन होऊ शकते, असेही राजेश मळसने यांनी सांगितले.