अमरावती - अमरावती शहरात नुपूर शर्माचे समर्थन करणारे औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्येमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यातच आता सोमवारी ( 11 जुलै ) सायंकाळी एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयासमोर हत्या करण्यात आली. त्यामुळे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. विकास शंकरराव गायकवाड ( वय 17, रा. भीम नगर ) असे अल्पवयीन तरुणाचे नाव आहे.
अशी घडली घटना - विकास गायकवाड शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. सोमवारी विकास हा केशरबाई लाहोटी महाविद्यालयासमोर उभा असताना त्याचा आरोपींसोबत काही कारणावरून वाद झाला. बघता बघता वाद विकोपाला गेला व अज्ञात आरोपींनी त्याच्या शरीरात चाकू भोसकून त्याची हत्या केली.
अज्ञात आरोपींचा शोध सुरू - घटनेची माहिती गाडगे नगर पोलिसांना मिळतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमुले हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य बघून अमरावती परिक्षेत्र मंडळ 2 चे पोलीस उपायुक्त एम. एम. मकानदार हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते. सदर हत्या प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ एक पथक गठीत केले आहे. आरोपींचा शोध घेणे सुरु आहे.
हेही वाचा - Udaipur Killing : कन्हैया लालबाबत पोस्ट करणाऱ्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी; जम्मू-कश्मीर मधून एकाला अटक