अमरावती : आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, परंतु मी गेल्यानंतर माझ्या मुलाबाळांना कोण सांभाळेल? असा प्रश्न अमरावतीमधील एका संत्रा उत्पादक शेतकऱ्याने केला आहे. देशात अचानक झालेल्या नोटाबंदीचा प्रचंड फटका हा विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. आता तब्बल चार वर्षानंतरही संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे संत्रागळती अजूनही सुरूच आहे. तर बाजारपेठेत मागणी घटल्याने आणि भावही घसरल्याने व्यापाऱ्यांनी संत्रा खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या संत्रा बागा अजूनही खरेदीच्या प्रतीक्षेत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे.
कोरोनाचा प्रचंड फटका..
यावर्षी विदर्भातील संत्रा विक्रीच्या काळातच देशात कोरोनाने शिरकाव केला होता. देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठा आणि आंतरराज्यीय वाहतूक बंद होती. त्यामुळे संत्राखरेदीही थांबली असल्याने, सर्व फळे झाडावरच सडून गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर अर्थिक नुकसान झाले होते.
संत्र्याची गळती थांबता थांबेना..
दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करून संत्रा बागांना आवश्यक ते खत, फवारणी, मशागत करतात. मात्र, ऑगस्ट महिन्यापासूनच सुरू झालेली आंबिया बहाराची गळणी ही अद्यापही सुरुच आहे. जवळपास पन्नास टक्के संत्रा हा शेतात गळून पडत असल्याचे शेतकरी सांगतात. विदर्भात सर्वाधिक संत्रा हा नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी तालुका हा विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख आहे. मात्र येथील संत्रा उत्पादक शेतकरीही सध्या हवालदिल झाला आहे. वातावरण होणाऱ्या बदलामुळे संत्र्याचा मोहोर गळण्याचे प्रमाण हे आता दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, कृषी विभागाच्या वतीने यावर अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने संत्रा गळती सुरूच आहे.
संत्र्यालाही हमी भाव द्यावा..
साधारणपणे संत्रा हा २३ ते ३० रुपये किलो विकला जात असतो. यंदा मात्र याच संत्र्याला केवळ ६ ते १० रुपये किलो बाजारभाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेला खर्चही निघणे कठीण आहे. त्यामुळे कापूस, तूर, सोयाबीन आदी पिकांप्रमाणे संत्र्याचाही हमीभाव शासनाने ठरवून द्यावा, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
नोटाबंदीचा फटका..
अमरावती जिल्ह्यातील रघुनाथपूर येथील संत्रा उत्पादक शेतकरी हिंमत महल्ले सांगतात, "माझ्याकडे संत्र्याची ३२५ झाडे आहेत. मागील वर्षी मी २२ हजार रुपये प्रती टन संत्रा विकला होता.परंतु आता मात्र ६ हजार रुपये प्रति टनापेक्षा कुठलाही व्यापारी संत्रा खरेदी करत नाहीये. ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये गारपीट झाल्याने संत्रा गळती सुरूच आहे. माझ्या शेतातील ५० टक्के संत्रा गळून पडला आहे." राज्यकर्त्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही हिम्मत महल्ले यांनी सरकारकडे केली आहे.
आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही..
संत्रा उत्पादक शेतकरी संजय बायस्कर सांगतात, "कर्जाचा डोंगर उभा करून संत्रा पीक घेतले. संत्रा झाडे दुष्काळात सुकू नये म्हणून मी कूपनलिकाही घेतली. मात्र, आता संत्र्याला भाव नसल्यामुळे परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. परंतु, माझ्या मुलाबाळांना कोण सांभाळेल हा प्रश्न असल्याचं बायस्कर म्हणाले.
हेही वाचा : 'शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा कोरा करा, अन्यथा दिवाळीच्या दिवशी महसूलमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन'