अमरावती : अमरावती शहरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर मनपाच्या पथकाकडून धडक कारवाई करण्यात आली. शहरातील रेल्वे स्टेशन चौक परिसरात गोळ्या, बिस्कीट, चॉकलेटच्या नावाखाली सुरु असलेल्या दुकानावर महापालिकेच्या पथकाने कारवाई करीत हे दुकान सील केले.
मनपा पथकाची कारवाई
शहरात संचारबंदी असतानाही गोळ्या, बिस्कीटच्या नावाखाली हे दुकान सुरू होते. पथकाने या ठिकाणी छापा मारला असता त्यांना या ठिकाणी पान मटेरियल विक्री सुरू असल्याचे आढळून आले. याशिवाय दुकानात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत नसल्याचेही दिसून आले. त्यामुळे पथकाने कारवाई करत हे दुकान सील केले. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाली होती आणि त्यांच्याच आदेशावर ही कारवाई करण्यात आल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
संचारबंदीच्या काळात नागरिकांना असुविधा होऊ नये यासाठी सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र काही ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. दुकानदार व नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला आहे.