नवी दिल्ली Gautam Singhania Divorce : रेमंड ग्रुपचे मालक आणि अब्जाधीश उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानियासोबत घटस्फोट घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून याची माहिती दिली होती. आता त्यांच्या पत्नीनं सिंघानिया यांच्या एकूण संपत्तीतील ७५ टक्के वाटा मागितला आहे. आपल्या दोन मुलींचा सांभाळ करण्यासाठी संपत्तीचा वाटा मागितला असल्याचं त्यांनी सांगितलं. गौतम सिंघानिया यांची एकूण संपत्ती अंदाजे ११ हजार कोटी रुपये एवढी आहे.
गौतम सिंघानिया यांचा प्रस्ताव : अहवालानुसार, गौतम सिंघानिया, नवाज यांच्या या विनंतीवर विचार करण्यास इच्छुक असल्याचं मानलं जातंय. परंतु त्यांनी कुटुंबाच्या मालमत्तेचं व्यवस्थापन आणि हस्तांतरणासाठी कौटुंबिक ट्रस्ट स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावानुसार, ते एकमेव व्यवस्थापन विश्वस्त म्हणून काम करतील आणि कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या निधनानंतर मालमत्तेचा वारसा दिला जाईल. मात्र, नवाज यांना हे मंजूर नाही.
नवाज मोदी सिंघानिया कोण आहेत : गौतम सिंघानिया यांच्या पत्नी नवाज मोदी सिंघानिया, बॉडी आर्ट नावाच्या फिटनेस सेंटरच्या साखळीसह फिटनेस उद्योगात सक्रिय आहेत. याशिवाय त्या रेमंड लिमिटेडच्या संचालक मंडळावर देखील काम करतात. विवाहाच्या ३२ वर्षांनंतर हे दोघं एकमेकांपासून विभक्त होत आहेत. गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत, विभक्त झाल्यानंतरही आम्ही दोघं मुलींची पूर्ण काळजी घेऊ आणि त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते सर्व करु, असं म्हटलंय.
रेमंडचा व्यवसाय : सुमारे ११,९०० कोटी रुपयांचं बाजार मूल्य असलेला रेमंड उद्योग समूह कपडे, डेनिम आणि ग्राहक सेवा यांच्यासाठी ओळखला जातो. गौतम सिंघानिया यांच्यासह रेमंडच्या शेअर्समध्ये विविध संस्थांचा हिस्सा आहे. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून गौतम सिंघानिया यांच्याकडे रेमंडचे ४९.११ टक्के शेअर्स आहेत.
हेही वाचा :