नवी दिल्ली – अब्जाधीश मुकेश अंबानी यांची मालकीची कंपनी असलेली रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारत पेट्रोलियमचा हिस्सा खरेदी करण्यासाठी बोली लावणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय रशियाची उर्जा कंपनी रोसनेफ्ट, सौदी अरेबियाची अराम्को कंपनीही भारत पेट्रोलियमच्या खरेदीकरता बोली लावणार असल्याची शक्यता आहे. या कंपन्या भारत पेट्रोलियममधील सरकारचा संपूर्ण 52.98 टक्के हिस्सा खरेदी करू शकतात, असे विविध सुत्रांनी सांगितले.
भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची तेल शुद्धीकरण करणारी कंपनी आहे. तर देशातील दुसऱ्या क्रमांकाची किरकोळ इंधन विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीमधील सरकारी हिस्सा खरेदी करण्यासाठी बोलीचे अर्ज भरण्याची शुक्रवारी मुदत संपत आहे.
देशामध्ये तेल शुद्धीकरणाचे विविध ठिकाणी असलेले प्रकल्प आणि कठोर कामगार कायद्यामुळे ब्रिटीश पेट्रोलियम आणि फ्रान्सची टोटल कंपनी भारत पेट्रोलियमच्या खरेदीसाठी उत्सुक नाहीत.
अशी आहे भारत पेट्रोलियम कंपनी
भारत पेट्रोलियमध्ये हिस्सा घेणाऱ्या कंपन्यांना मुंबई, कोचीसह मध्यप्रदेशमधील तेल शुद्धीकर प्रकल्पाची मिळणार आहे. तसेच 16 हजार 309 पेट्रोल पंप आणि 6 हजार 113 एलपीजी वितरकांचे जाळे मिळणार आहे. याशिवाय खरेदीदाराला 256 विमान इंधनाचे स्टेशन मिळणार आहेत. भारत पेट्रोलियमच्या वितरकांचे जाळे देशभर पसरलेले आहे. कंपनीचा बाजारात 22 टक्के हिस्सा असल्याने हा व्यवहार खरेदीदारांना आकर्षक असल्याचे सूत्राने सांगितले. बीपीसीएलचे भांडवली मूल्य हे 98 हजार 400 कोटी रुपये आहे. तर सरकारचा त्यामध्ये 52 हजार कोटींचा हिस्सा आहे.
रिलायन्सने नुकतेच भारत पेट्रोलियमचे (बीपीसीएल) चेअरमन सार्थक बेहुरिया यांना सेवेत रुजू करून घेतले आहे. यामधून कंपनीला बीपीसीएलमधील हिस्सा खरेदी करण्याची इच्छा असल्याचे दिसून येते. याबाबात वृत्तसंस्थेकडून पाठविलेल्या ई-मेलला उत्तर मिळू शकले नाही.
दरम्यान, बीपीसीएलचे खासगीकरण करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2020-21 सादर करताना केली होती.