हैदराबाद – काँग्रसेच ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. सध्याचे देशातील आर्थिक संकटाचे व्यवस्थापन करण्यात मोदी सरकारला पूर्ण अपयश आल्याची चिदंबरम यांनी टीका केली.
ईटीव्ही भारतशी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम म्हणाले, की देशातील आर्थिक संकट वाढत असताना त्याच्या प्रमाणाबद्दलचे आकलन हे भाजप सरकारला कधी होणार आहे? पंतप्रधानांना त्यांच्या अपयशाचे आणि त्यांच्या आर्थिक व्यवस्थापकांच्या अपयशाचे आकलन कधी होणार आहे? कोरोना महामारीत आर्थिक विकासदर मंदावला असताना विमान वाहतूक आणि दूरसंचार क्षेत्र हे टिकण्यासाठी संघर्ष करत आहेत.
पी. चिदंबरम यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत देशातील विमान वाहतूक आणि दूरसंचार क्षेत्र कसे संकटात आहे, याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की देशातील मोठी दूरसंचार कंपनी कोसळण्याच्या स्थिती असल्याचे सरकारला समजणार आहे का? संकटात असलेल्या दूरसंचार क्षेत्राला वाचविण्यासाठी सरकारकडे कोणतेही नियोजन नाही. विमान वाहतूक क्षेत्राबद्दल चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले, की विमान वाहतूक क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाल्याचे सरकारला समजणार आहे का? जर दिलासादायक नियोजनासाठी सरकारने पाऊल उचचले नाही, तर प्रत्येकजण एअर इंडियाने जाणार आहे का? गेल्या 12 महिन्यांत लाखो लोकांनी उदरनिर्वाह गमाविला आहे. यामध्ये विमान वाहतूक आणि दूरसंचार क्षेत्रातील लोकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हजारो नोकऱ्या गमाविल्या आहेत.
दरम्यान, केंद्रीय दूरसंचार विभागाने थकित एजीआर शुल्कापोटी व्होडाफोन आयडियाकडे सुमारे 58 हजार 254 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे व्होडाफोन आयडिया कंपनी आर्थिक संकटात आहे. भारती एअरटेलचे चेअमन सुनील मित्तल यांनीही सरकारच्या दूरसंचार धोरणाबाबत वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मित्तल म्हणाले, की भविष्यातील तंत्रज्ञानासाठी दूरसंचार कंपन्यांनी गुंतवणूक करावी, यासाठी सरकारने उत्तरदायित्व राहिले पाहिजे. तसेच मोठे आर्थिक नुकसान झालेले असताना त्यात दुरुस्ती करण्यासाठी सरकारने मदत करणे आवश्यक आहे.
विमान वाहतूक सल्लागार कंपनी कॅपा इंडियाच्या माहितीनुसार एप्रिल ते जुनमध्ये देशातील विमान वाहतूक क्षेत्राचे 3 अब्ज डॉलर ते 3.6 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.