सांगली - सांगली बाजार समितीमधील सौद्यात राजापूरी हळदीला 24 हजार 100 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला आहे. गेल्या दहा वर्षातील सर्व रेकॉर्ड या दराने मोडले आहेत. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सांगली बाजार समितीत नवीन वर्षातील हळदीचे सौदे काढले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून हळदीचे दर वाढत असल्याचे चित्र आहे. प्रारंभी 11 हजार प्रति क्विंटल मिळालेले दर आता 24 हजारांच्या घरात पोहोचला आहे.
हेही वाचा-इंधनावरील कर कपातीकरता राज्य व केंद्र सरकारमध्ये समन्वय असण्याची गरज
हळदीचा बाजार तेजीत...
जागतिक हळदीची बाजारपेठ म्हणून सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. गतवर्षी झालेली अतिवृष्टी त्यानंतर कोरोना लॉकडाऊन यामुळे हळदीचे उत्पादन यंदा घटले आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी 2021 पासून नवीन हळदीच्या सौद्यांना सुरुवात झाली आहे. प्रारंभी राजापुरी हळदीला सात हजारांपासून अकरा हजारपर्यंत दर मिळाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हळदीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. हळदीच्या सौद्यात आता तेजी पाहायला मिळत आहे. दोन दिवसात पार पडलेल्या हळद सौद्यात हळदीला उच्चांकी दर मिळत आहे.
हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांक दिवसाखेर २५८ अंशाने वधारला; निफ्टी पुन्हा १५ हजारांच्या टप्प्यावर
बुधवारी मार्केट यार्ड येथील मेसर्स संगमेश्वर ट्रेडर्स या दुकानात झालेल्या हळद सौद्यात शेतकरी रामाप्पा नेमगोंडर (रा. गुरलापूर, जि. बेळगाव) यांच्या राजापुरी हळदीला 24 हजार 100 रुपये प्रति क्विंटल इतका आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांकी दर मिळाला. तर सातारा जिल्ह्यातील एका हळद उत्पादक शेतकऱ्याला 21 हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
10 वर्षातील उच्चांकी दर..
हळद व्यापारी राजेंद्र मेणकर म्हणाले की, गेल्या दोन वर्षात अतिवृष्टी आणि कोरोनाचा परिणाम हळद उत्पादनावर झालेला आहे. त्यामुळे यंदा हळदीचे उत्पादन घटले आहे. तर दुसर्या बाजूला हळदीची मागणी वाढली आहे. आता हळद बाजारात दाखल होत आहे. गेल्या दहा वर्षात हळदीला जितका उच्चांकी दर मिळाला नाही. तो यंदाच्या वर्षी मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असल्याचे राजेंद्र मेणकर यांनी स्पष्ट केले आहे.