नवी दिल्ली - टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) बीएस-६ इंजिनक्षमतेच्या इनोव्हा क्रिस्टाची बुकिंग सुरू केली आहे. या चारचाकीची किंमत १५.३६ लाख आणि २४.०६ (एक्स शोरुम दिल्ली) आहे.
इनोव्हा क्रिस्टाचा पुरवठा पुढील महिन्यापासून देशभरात सुरू होणार असल्याचे टोयोटा किर्लोस्करने (टीकेएम) म्हटले आहे. पेट्रोल आणि डिझेल श्रेणीतील बीएस-६ इंजिनक्षमतेच्या इनोव्हा क्रिस्टा ही स्वयंचलित तसेच बिगर स्वयंचलित प्रकारात उपलब्ध आहे. अधिक प्रगत आणि पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान भारतीय बाजारपेठेत आणण्यासाठी बांधील असल्याचे टीकेएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री आणि सेवा) नवीन सोनी यांनी सांगितले. ठराविक मुदतीसाठीच सवलतीच्या दरात मॉडेलची बुकिंग केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डोंगरावर मदत नियंत्रण, वाहन स्थिरतेसाठी नियंत्रण, आपतकालीन ब्रेक सिग्नल हे इनोव्हा क्रिस्टाचे गुणवैशिष्ट्ये आहेत.
मल्टी पर्पोज व्हिकल श्रेणीत इनोव्हा ही गेली १५ वर्षे भारतात आघाडीवर राहिली आहे. २००५ ला लाँचिंग झाल्यापासून ९ लाख इनोव्हाची विक्री झाली आहे. तर २.७ लाख इनोव्हा क्रिस्टाची विक्री झाल्याचे टीकेएमने म्हटले आहे.
हेही वाचा-सोने महागले! प्रति तोळा ८५७ रुपयाने वाढून 'एवढी' झाली किंमत
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे १ एप्रिल २०२० पासून कंपन्यांना केवळ बीएस-६ इंजिनक्षमतेच्या वाहनांची विक्री करता येणार आहे. या प्रकारच्या वाहनांमधून कार्बनचे कमी उत्सर्जन होते.